पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/67

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लजपतराय याच प्रेरणेतून पुढे आले. स्वामी विवेकानंद असेच संन्यासी होते. पण भारताच्या स्वातंत्र्यावर त्यांची गाढ श्रद्धा होती. स्वामी रामतीर्थ तर स्वतःला भारतरुपच समजत असत. मीच भारतवर्ष आहे. पंजाब व बंगाल माझे बाहु, काश्मीर माझे डोके, कन्याकुमारी माझे पाय आहेत. एक हृदय, एकात्मा असणारा भारतच मी आहे. असे ते म्हणत. स्वामी रामानंद तीर्थांच्या रूपाने रामतीर्थांची प्रेरणा कार्यरत होती.

 खरे म्हणजे या यादीतच आपण महात्मा गांधी आणि संत विनोबा भावे यांचाही समावेश केला पाहिजे. गांधीजी हे रूढ अर्थाने संन्यासी नव्हते. त्यांनी दीक्षापूर्वक भगवी वस्त्रे धारण केलेली नव्हती, हे खरेच आहे, पण ते धर्मपुरुषच होते. ईश्वरावर त्यांची गाढ श्रद्धा होती. परमेश्वराच्या इच्छेशिवाय गवताचे एक पातेही हलत नाही असे ते म्हणत. नानाविध प्रकारची व्रते आणि भजने, सकाळ-संध्याकाळच्या प्रार्थना, मौन आणि ध्यानचिंतन हा सगळा गांधीजींचाही प्रकार होता. ते आत्म्याचा शोध घेणारे प्रवासी होते. शंकराचार्य म्हणत ब्रह्म तेवढे सत्य आहे. या सत्यस्वरूपी ब्रह्माचा शोध घेण्यासाठी गांधीजी जन्मभर अहिंसेची साधना करीत होते. भारताच्या स्वातंत्र्यासाठी तू सर्वस्व पणाला लाव असे त्यांना त्यांच्या आतल्या आवाजाने सांगितले होते. हा आत्म्याचा म्हणजे ईश्वराचाच आदेश होता. गांधींचे शिष्य विनोबा म्हणजे तर चालते बोलते तपच. विनोबांचे मन गीता, उपनिषदे यातच गुंतलेले होते. एकदा एकजणाने विनोबांना विचारले, 'हा समोरचा कंदील खरा आहे. यावर जितकी दृढ़ श्रद्धा आहे तशी ईश्वराच्या अस्तित्वाविषयी तुम्हाला खात्री व श्रद्धा आहे का?' विनोबा म्हणाले, 'मी ईश्वराविषयी निःशंक आहे. समोरच्या कंदिलाची मात्र खात्री देता येत नाही'. या देशातले कोटी कोटी लोक गांधी-विनोबांना संतच मानतात आणि दोघांनाही राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा, राजकारणाचा विचार करणे भाग पडत गेले. ज्याला तुम्ही आम्ही राजकारण म्हणतो तो गांधी-विनोबांसाठी परमेश्वराच्या उपासनेचा मार्ग होता, त्यांची ती अध्यात्मसेवा होती.

 कै. स्वामी रामानंद तीर्थांच्या जीवनावर आत्यंतिक प्रभाव टाकणाऱ्या या तीन विभूती होत. स्वामी रामानंद हे पहिले. त्यांच्या परंपरेचे ते संन्यासी होते. महात्मा गांधी हे दुसरे आणि विनोबा तिसरे. यांचे स्वामी अनुयायी होते. स्वामीजी हे अहिंसेचे थोर उपासक होते व निर्भयपणे सशस्त्र आंदोलनाचे दायित्व स्वीकारणारे आणि त्या लढ्याचे मार्गदर्शन करणारेही होते. ज्यांची उपासना इहलोकासाठी चालू आहे असेही

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ६६