पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/66

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सत्पुरुषांची नावे आपणास सहज घेता येतील. विद्यारण्य, गुरू गोविंदसिंह आणि रामदास. ही तीन नावे इतिहासात प्रसिद्ध आहेत. विद्यारण्य माधवाचार्य हे आपल्या काळातले महापंडित होऊन गेले. अनेक शास्त्रांच्यावर त्यांची ग्रंथरचना आहे. सर्वदर्शन-संग्रह त्यांच्या चौरस व्यासंगाचा पुरावा आहे. विद्यारण्य संन्यासी होते. पुढे ते शृंगेरी पीठाचे शंकराचार्य झाले. त्यांच्या डोळ्यांसमोर अल्लाउद्दिन खिलजीने सारा दक्षिण भारत जिंकला. हे प्रसिद्धच आहे की हरिहर आणि बुक्कराय यांना प्रेरणा स्वामींची होती. ज्याला आपण विजयानगर म्हणून ओळखतो तो मूळचे विद्यारण्यनगर होते. हिंदूंना सन्मानाने आणि प्रतिष्ठेने जगता आले पाहिजे यासाठी राजकारणात रस घेऊन राज्यनिर्मिती घडवून आणणारा हा एक प्रसिद्ध संन्यासी. समर्थ रामदासस्वामींचे चरित्रसुद्धा असेच आहे. खरे म्हणजे वैराग्यशाली रामदासांना काही नको होते. घरदार, संसार सोडून टाकळीला जाऊन स्वामी तप करीत वसले. त्यांना ईश्वरदर्शनही घडले. पण या निरिच्छ संतांना राजकारणात रस होता. हिंदूंचे एक स्वतंत्र सार्वभौम राज्य असले पाहिजे अशी जबर इच्छा होती. हिंदुराज्य निर्माण झाले असते तर रामदासाला काय मिळणार होते? त्याला काहीच नको होते. स्नानसंध्या करण्यासाठी गंगेत उदंड पाणी होतेच. पण ती संध्याही निर्वेध चालावयाची असेल तर गंगेच्या दोन्ही काठांवर आपले राज्य हवे म्हणून रामदासाने शिवाजी महाराजांच्या मागे आपले पुण्य उभे केले व छत्रपती ईश्वरी अवतार आहेत अशी घोषणा केली. दशमेश गुरु गोविंदसिंह हे तर धर्मगुरूच होते, पण त्यांना हातात शस्त्र घेऊन लढावे लागले. ज्या ज्या वेळी राष्ट्र गुलाम व परतंत्र होतात त्या त्या वेळी संत-संन्याशांना राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा विचार करणे भाग पडते असे दिसून येईल.

 आधुनिक भारतात समाजांचे दायित्व पत्करणाऱ्या व स्वातंत्र्याचा विचार करणाऱ्या संन्याशांची एक परंपराच आहे. या स्वातंत्र्यवादी असणाऱ्या आधुनिक भारतातील संन्यासी नेत्यांना फार मोठे महत्त्व आहे. हजारो कार्यकर्त्यांना राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी जीवित समर्पण करण्याची प्रेरणा या तीन संन्याशांनी दिली. कालक्रमानुसार ही नावे म्हणजे स्वामी दयानंद, स्वामी विवेकानंद व स्वामी रामतीर्थ. स्वामी दयानंद हे राजकीय नेते नव्हते. वेदावर कठोर निष्ठा असणारे संन्याशी होते, पण जातिभेद निवारण, अस्पृश्यता निवारण, आधुनिक शिक्षण यात तर त्यांनी रस घेतलाच पण त्याबरोबर राष्ट्रीय स्वातंत्र्याची प्रेरणाही त्यांनी दिली. स्वामी श्रद्धानंद व लाला

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ६५