पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/62

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हा लढा देण्याचे भाग्य स्वामीजींना लाभले. हैदराबाद संस्थान भारतात विलीन झालेले व शेवटी समाप्त, नामशेष झाल्याचे पाहाण्याचा योगही त्यांना आला. शेवटी हैदराबाद संस्थान दफन झाल्याविना महाराष्ट्रही शक्य नव्हता. आंध्रही शक्य नव्हता. भाषावार प्रांतरचनाच शक्य नव्हती. ज्या दिवशी हैदराबाद संपले त्या दिवशी स्वामीजींचे जीवितकार्य संपले. जीवन कृतार्थ झाले. यानंतर त्यांना त्यांच्याच शब्दात सांगायचे तर "सद्भावना प्रसाराविना दुसरा छंद उरला नाही". सर्वोदयाकडे ते याच नजरेने पाहत असत.

 हैदराबाद लढ्याचे नेते म्हणून ते मुसलमानांचे लाडके असू शकत नव्हते. नेहरूनिष्ठ समाजवादी म्हणून सरदार गट त्यांच्यावर रुष्ट होता. हैदराबाद विभाजनाच्या आग्रहामुळे त्यांच्यावर पुढे नेहरूही नाराजच होते. भोगवादी राजकारणात स्वामीजींचे पुण्य आपल्या स्वार्थावरील झूल होऊ शकत नाही हे कळल्यावर अनुयायी फारच जवळ टिकू शकले नाहीत. स्वामीजींनी तसा प्रयत्नही केला नाही. शेवट ती समर्पणांजली होती. तिला स्वतःच्या विसर्जनाची ओढ होती. स्वार्थाच्या सोयी पाहणे त्यांना कसे शक्य असणार? आपण काय आहो ही पक्की खात्री असल्यामुळेच बहुधा ते नित्य तृप्त होते.

***

(प्रकाशन : दैनिक प्रजावाणी, २५-१-१९७२)

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ६०