पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/59

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 १९४७ च्या सात ऑगस्टला आपला लढा सुरू झाला. यापूर्वी सरदारांनी तुम्हाला नेमके काय सांगितले होते? असे म्हणतात की, सरदारांनी अखंडपणे लढा चालू ठेवा, संघर्ष जिवंत राहू द्या, जेल भरलेले असू द्या, माऊंटबॅटन परतल्यानंतरच हा प्रश्न सोडविता येईल असे सांगितले होते हे खरे आहे का? माऊंटबॅटन गव्हर्नर जनरल असणे अनेक कारणांसाठी सोयीचे होते. पण हैदराबाद प्रश्नासाठी ती अडचण आहे, असे सरदारांचे मत होते का? हा संदर्भ मनात ठेवूनच तुम्ही लढ्याचा ठराव स्वीकारताना हा संघर्ष टर्मपुरता नसून पूर्ण वर्षाचा आहे, असे सूचक बोलला होता का? (स्थूलपणे हे बरोबर आहे. शब्दशः चूक.)

 इत्तेहादुल मुसलमीन निजामाला सार्वभौम मानीत नव्हती. हैदराबाद संस्थानातील मुसलमान जनता सार्वभौम असून निजाम त्या सार्वभौमत्वाचे प्रतीक आहे, असे मानी. त्या भूमिकेचा प्रतिवाद काँग्रेसच्या राजकारणात नाही. हे सहजच घडले की जाणीवपूर्वक घडले?

 (जबाबदार राज्यपद्धतीचा आग्रह ह्या सर्वच भूमिकांचा विधायक प्रतिवाद होता.)

 हे आणि असे शेकडो प्रश्न आमच्यासमोर उभे आहेत आणि तुमचे आत्मवृत्त सर्व ठिकाणी गप्प आहे. आपण मोकळेपणाने सर्व प्रश्नांची उत्तरे का दिली नाहीत, हे तुम्हाला विचारण्यातही अर्थ नाही. मुन्शींनी जर विपर्यास केला नसता तर तुम्ही हे जे लिहिले तेही लिहिले नसते, हेच खरे. शेवटी आभार के. एम. मुन्शींचेच मानायला हवेत.

 पत्राबद्दल सविस्तर उत्तराची अपेक्षा नाही. पण हे पत्र समोर ठेवून आपण काही बोलावे, काही सांगावे ही मात्र अपेक्षा आहे. आपला आशीर्वाद हे माझे भाग्य आहे. खरोखरी मला त्याहून निराळे काहीच नको आहे.

आपला नम्र,

नरहर कुरुंदकर

टीप : कै. स्वामी रामानंद तीर्थ यांना माझे हे पत्र होते. त्यांनी पत्र परत केले. तोंडी पुष्कळ चर्चा केली. कंसामध्ये असलेली वाक्ये मी लिहून घेतलेली आहेत. वाक्ये स्वामीजींची. चर्चा लगेच लिहून ठेवण्याचे अवधान राहिले नाही. ते इतक्यात लवकर जातील असे वाटले नव्हते.

***

(प्रकाशन : 'ललित' दिवाळी १९७२)

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ५७