पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/58

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे म्हणून भारताच्या प्रादेशिक सलगतेसाठी हैदरावादेत प्रबल व संघटित जनमत आवश्यक आहे हा निर्णय गांधीनी घेतला काय?

 (ते महात्माजी जाणोत, बलिदानाची तयारी ठेवणारा भेटला. त्याला आशीर्वाद मिळाला इतके मी जाणतो.)

 स्टेट काँग्रेसवर जन्मापासून बंदी होती. आंध्र महासभा, कर्नाटक महासभा, महाराष्ट्र परिषद ह्यांद्वारे काही काम चालू होते. अचानक १९४५ ला महाराष्ट्र परिषदेने असा ठराव केला की, जनतेला जवाबदार राज्यपद्धती संस्थानात निर्माण करणे हे महाराष्ट्र परिषदेचे ध्येय आहे. हा ठराव करणे म्हणजे महाराष्ट्र परिषदेवर बंदी बोलावून घेणे होते. मग असा ठराव का केला गेला? भारतीय स्वातंत्र्य जवळ आले आहे, ह्यावेळी गप्प बसणे योग्य नव्हे ह्या जाणिवेने की हा ठराव स्टेट काँग्रेसवरील बंदी उठण्यास उपकारक ठरेल, ह्या कुणाच्या तरी चतुर सूचनेमुळे ? मला दुसरा संभव जास्त दिसतो. कारण ह्यानंतर लवकरच स्टेट काँग्रेसवरील बंदी इंग्रजांच्या दडपणाने उठविण्यात आली. पण हा माझा अंदाज झाला; सत्य काय आहे?

 (गप्प बसणे योग्य नाही असे वाटले.)

 १९४६ सालच्या हैदराबादच्या निवडणुकीविरूद्ध सत्याग्रह करण्याची घोषणा मागे घेऊन फक्त बहिष्कार घालावा, हा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय अतिशय योग्य होता, ह्यात शंकाच नाही. निर्णायक लढा जवळ येत असताना गौण प्रश्नांवर शक्ती खर्चण्यात अर्थ नव्हता हे खरेच आहे. स्वातंत्र्य जवळ येत आहे. निर्णायक लढा देण्याची वेळ येत आहे. अशा वेळी शक्ती खर्चू नका, हा सल्ला कुणी दिला? कार्यकर्तेच विचारांती ह्या निर्णयावर आले, की नेहरूंचा हा सल्ला होता? तुमचे मित्र शेख अब्दुल्ला यांनी जबाबदार राज्यपद्धतींसाठी लढा सुरू केला. त्यांना परवानगी मिळाली. शेख अब्दुल्लांनी सल्ला न ऐकता लढा दिला काय? भारतात विलीन व्हा, ह्या मुद्दयावर लढा देणे अब्दुल्लांना अशक्य होते म्हणून त्यांना परवानगी देण्यात आली होती का? की तो फक्त सामर्थ्य (!) प्रदर्शनाचा कार्यक्रम होता? नेहरूंनी त्या लढ्यात भाग घेतला आहे.

 (शेख साहेब माझे मित्र नव्हते. भारतीय स्वातंत्र्याच्या वाटाघाटीत त्यांना संस्थानांना स्वतंत्र प्रतिनिधित्व हवे वाटे. मला त्याची गरज नसे. नेहरू त्यांचे सावधपणे मित्र होते. माझ्या तोंडचा 'मित्र' हा शब्द उच्चारवजा होता.)

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ५६