पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/51

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मानतो. ही एक वेदप्रामाण्य मानणारी कडवी धार्मिक चळवळ आहे. व्यवहारात आर्यसमाज मुस्लिम आक्रमणाच्या विरूद्ध नेहमीच हिंदूंचा त्राता राहत आलेला आहे. आर्यसमाजाचा अहिंसेवर फारसा आग्रह नसतो. त्यांचा मुस्लिम विरोध, अहिंसा विरोध प्रसिद्ध आहे. पण नेहमीच आर्यसमाजाचे लोक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे काँग्रेसच्या राजकारणात राहत गेले. लाला लजपतराय, स्वामी श्रद्धानंद यांच्यापासून आजच्या चरणसिंगापर्यंत प्रायः आर्यसमाजी नेते काँग्रेसमध्ये राहत आले आहेत. आर्यसमाजाचा सत्याग्रह १९३८ साली जोमाने सुरू झाला. काँग्रेसचा सत्याग्रह संपल्यानंतरही आर्यसमाजाने काही महिने सत्याग्रह चालविला. आर्य समाजातून बाहेर पडलेले हे सत्याग्रही कार्यकर्ते पुढच्या काळात प्रामुख्याने काँग्रेसमध्ये राहिले. गुलबर्गा आणि बिदर या जिल्ह्यातील बहुतेक सर्व काँग्रेस कार्यकर्ते आर्यसमाजी होते. आर्यसमाजाच्या या आंदोलनामुळेसुद्धा अनेक कार्यकर्ते राष्ट्रीय प्रवाहात सामील झाले. आर्य समाजाचे वरिष्ठ नेते काँग्रेसच्या राजकारणाशी निगडीत असल्यामुळे काँग्रेसचे आंदोलन सुरू होण्याच्या आगेमागे आर्यसमाजाचे आंदोलनं सुरू व्हावे आणि काँग्रेसचे आंदोलन संपल्यानंतर काही महिन्यांनी आर्यसमाजाचे आंदोलन संपावे हे साहजिकच होते. आर्यसमाजाने जाहीररीत्या आपला व काँग्रेसचा संबंध कधी कबूल केला नाही. उलट आपल्या आंदोलनाच्या वेळी स्वतःचे आंदोलन सुरू करून काँग्रेस गोंधळ माजवीत आहे असे सांगून आर्यसमाजाने काँग्रेसचा निषेधही केला. बाहेर एकमेकांच्या विरुद्ध आरोळ्या ठोकणारे हे दोन्ही गट गांधीजींचा सल्ला घेत असत, हे उघड गुपित आहे.

 आर्यसमाजाने हैदराबादेतील हिंदूंना प्रतिकाराची सवय लावली. प्रसंगविशेषी हत्यार चालविण्याइतकी हिंमतही लोकांच्यामध्ये प्रथम आर्यसमाजानेच निर्माण केली. हातात काठी अगर तलवार घेऊन आक्रमणाच्या प्रतिकाराला या संस्थानात हिंदू माणूस तयार करण्याचे श्रेय आर्यसमाजालाच दिले पाहिजे. आर्यसमाजाच्या सहवासातच हैदराबाद येथील जनता सशस्त्र प्रतिकाराच्या दृष्टीने तयार होऊ लागली. पुढे हैदराबादच्या मुक्ती आंदोलनात उमरी बँकेच्या लुटीचे एक प्रसिद्ध प्रकरण आहे. या उमरी बँक प्रकरणाचे एक संयोजक धनजी पुरोहित निष्ठावंत आर्यसमाजी आणि निष्ठावंत काँग्रेसभक्त होते.

 याच वेळेला हिंदू महासभा ही स्वांतत्र्यवीर सावरकरांच्या नेतृत्वाखाली लढाऊ रूप घेत होती. हिंदू महासभेने हिंदूंच्या धार्मिक अधिकारांच्या संरक्षणासाठी भागानगर

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ४९