पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/50

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लक्ष रुपयांची देणगी दिलेली होती. बनारसचे हे हिंदृ विद्यापीठ अन्यायाच्याविरूद्ध लढणाऱ्या हिंदू विद्यार्थ्यांना सहानुभूती दाखवू इच्छीत नव्हते. कारण आपल्या मुस्लिम आश्रयदात्याला नाराज करण्याची विद्यापीठाची तयारी नव्हती. या बहिष्कार घालणाऱ्या विद्यार्थ्यांना नागपूर विद्यापीठाने आश्रय दिला.

 या विद्यार्थ्यांच्या बहिष्कार व सत्याग्रह आंदोलनाला हैदराबादच्या चळवळीत फार मोठे महत्त्व आहे. जी मंडळी नागपूर विद्यापीठात गेली ती त्या विद्यापीठातून पदवीधर झाली पण इकडे हैदराबाद संस्थानात त्यांना सरकारी नोकरी मिळणे शक्य नव्हते. हैदराबाद संस्थानात पुष्कळसे तरुण राजकीय कार्यकर्ते या सत्याग्रहातून वर आलेले आहेत. हैदराबाद संस्थानातील अनेक प्रसिद्ध कम्युनिस्ट कार्यकर्ते या आंदोलनातून उदयाला आले. १९३९ साली वंदे मातरम् म्हणणे हा आपला पवित्र हक्क आहे. हिंदूंच्या धर्मांवर होणारे आक्रमण ताबडतोव थांबवा, आम्हाला धार्मिक न्याय व समानता पाहिजे अशा घोषणा देणारे हे तरुण कार्यकर्ते धार्मिक राजकारणात फार काळ राहू शकले नाहीत. वंदे मातरम् चळवळीतील बहुतेक सर्व कार्यकर्ते पुढच्या काळात काँग्रेसमध्ये अगर कम्युनिस्ट पक्षात गेले. धार्मिक आक्रमण असणाऱ्या समाजात धार्मिक प्रश्नावर सुरू झालेली आंदोलनेसुद्धा धर्मातील प्रवाहात मिसळत गेली. जिथे हिंदू मुसलमानांच्या विरूद्ध लढत होते तिथेही हिंदुत्ववादी राजकारण फारसे प्रभावी राहू शकले नाही.

 वंदे मातरम् आंदोलन विद्यार्थ्यांनी जेव्हा सुरू केले त्याच्या किंचित आधी आर्यसमाजाचे आंदोलन सुरू झालेले होते. आर्यसमाज ही संघटना लढाऊ संघटना आहे. आर्यसमाजाच्या कार्यकर्त्यांना मारहाण, आर्यसमाज मंदिरातील होमकुंड फोडणे या बाबी फार काळ ती संघटना सहन करणे शक्य नव्हते. एकदोन गावी तर आर्यसमाजाने प्रतिकारही करून पाहिला. शासनाने आर्यसमाजाच्या काही काही कार्यकर्त्यांवर गुंडगिरीबद्दल खटले भरले. हे खटले चालू असतानाच शामलाल आर्य यांचा मृत्यू झाला. यामुळे आपल्या धार्मिक मागण्यांसाठी आर्यसमाजाने सत्याग्रह सुरू केला. आर्यसमाज ही संघटना थोडी समजून घेण्याजोगी आहे. स्त्रीशिक्षण, प्रौढ शिक्षण, पुनर्विवाह, जाती निर्मूलन, अस्पृश्यता निवारण असे समाजसुधारकांचे सर्व कार्यक्रम आर्यसमाज उत्साहाने हाताळतो. पण तो वेदाचा कडवा अनुयायी आहे. आर्यसमाज स्वतःचा धर्मच मानतो. आपला धर्म हाच एकमेव खरा धर्म आहे असे तो

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ४८