पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/49

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लागली. या परिस्थितीत उस्मानिया विद्यापिठातील वंदे मातरम् हे प्रकरण उद्भवले. हैदराबाद संस्थानात धर्मशिक्षण याचा अर्थ मुसलमानांना मुस्लिम धर्माचे शिक्षण इतकाच होई. इतरांना धर्मशिक्षण दिले जात नसे. शुक्रवारी नमाजसाठी लांब सुटी असे. विद्यापीठाच्या वसतिगृहात नमाजची स्वतंत्र सोय होती. म्हणून उस्मानिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी अशी मागणी केली की आम्हालाही आमच्या धार्मिक उपासनेची परवानगी असावी. वसतिगृहाच्या चालकांनी हिंदूंनाही धर्म उपासनेसाठी एक हॉल दिला. या हॉलमध्ये प्रार्थना, भजने इत्यादि कार्यक्रम होत. हिंदू विद्यार्थ्यांनी स्वतःला मुसलमानांच्या बरोबरीचे समजावे आणि नमाजसाठी हॉल मागताच भजनासाठी हॉल मागावा हे मुस्लिम विद्यार्थ्यांना आवडले नाही. तिथून कुरबुरीचा आरंभ झाला. हे हिंदू विद्यार्थी आपल्या प्रार्थनेत वंदे मातरम् हे गीत म्हणत. त्या गीतामुळे आपल्या धर्मभावना दुखावतात असे मुस्लिम विद्यार्थ्यांचे म्हणणे होते.

 वंदे मातरम् या गीताविषयी काँग्रेस पक्षातच वाद होते. पण त्या वादाचे स्वरूप निराळे होते. या गीतात भारताचे वर्णन हिंदू देवीप्रमाणे केले आहे म्हणून हे गीत आम्ही राष्ट्रगीत म्हणून मान्य करणार नाही असे काँग्रेसमधील मुसलमानांचे म्हणणे होते. वंदे मातरम् हे गीत तुम्ही म्हणणार असाल तर म्हणा, तुम्हाला आवडतं असेल तर असो. आम्हाला हे गीत आवडत नाही यामुळे आम्हाला न आवडणारे गीत राष्ट्रगीत नको. ही मागणी अगदी वेगळी आहे. आमच्यावर वंदेमातरम् लादू नका ही ती मागणी आहे. उस्मानिया विद्यापीठातील मुस्लिम विद्यार्थ्यांची मागणी यापेक्षा निराळी होती. तुम्ही वंदे मातरम् म्हणू नका असे त्यांचे म्हणणे होते. मुस्लिम विद्यार्थ्यांच्या या मागणीवर विचार होऊन हैदराबाद शासनाने असा एक आदेश काढला की विद्यापीठात अगर महाविद्यालयात वंदे मातरम् हे गीत म्हणू नये. सार्वजनिक ठिकाणीही हे गीत म्हणू नये. या आदेशाविरूद्ध उस्मानिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. हे विद्यार्थी महाविद्यालयावर बहिष्कार टाकून बाहेर तर पडलेच पण वंदे मातरम् गीत गाऊन त्यांच्यातील अनेकांनी सत्याग्रह केला. वंदे मातरम् हा १९३८ सालच्या सत्याग्रही लढ्याचा आरंभ होता. एकूण विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्यापैकी मोठ्या संख्येने हिंदू विद्यार्थ्यांनी यावेळी महाविद्यालये सोडली. हे विद्यार्थी शिक्षणासाठी संस्थानाबाहेर पडले. या विद्यार्थ्यांची एक फार मोठी अपेक्षा अशी होती की मालवीयांचे बनारस विद्यापीठ आपले स्वागत करील. पण बनारस विश्व हिंदू विद्यापीठाला निजामाने एक

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ४७