पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/48

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि राजकीय जागृती यादृष्टीने आर्यसमाजाने हैदराबादेत फार मोठे कार्य केलेले आहे. हळूहळू हिंदू समाजात स्वाभिमानाचे वारे वाहू लागले होते.

 या सुमारास इत्तहादुल मुसलमीन या संघटनेचे नेते बहादूर यार जंग यांनी वातावरण तापविण्यास आरंभ केला. निजामाची इच्छा अशी होती की हैदराबाद संस्थानातील मुसलमानांची एक बलवान संघटना असावी. या संघटनेचा निजामाच्या राजवटीला आणि हैदराबाद एक स्वतंत्र राष्ट्र या कल्पनेला पाठिंबा असावा. बहादूर यार जंग निजामाची ही इच्छा पार पाडण्यासाठी कटिबद्ध होते. पण राजकारणाला काही स्वतःचे नीतिनियम असतात. मुसलमानांच्यामध्ये प्रचार आणि जागृती आणि त्याचे एका संघटनेत रूपांतर हा उद्योग सुरू झाला की त्याला एखाद्या वैचारिक भूमिकेची गरज लागते. हैदराबाद हे मुसलमानांनी जिंकलेले राष्ट्र आहे. या राष्ट्राचे मालक संस्थानातील सोळा लक्ष मुसलमान आहेत, त्यांच्या इच्छेने प्रतिनिधी निजाम आहेत ही बहादूर यार जंग यांची भूमिका होती. मुसलमानांनी संघटित होऊन निजामाच्या मागे उभे राहावे हा हेतू या आंदोलनाने साध्य होणार होताच पण त्याबरोबर मुसलमानांनी स्वतःला राज्याचे स्वामी मानावे आणि निजाम हा सर्वांच्या इच्छेचा प्रतिनिधी नाममात्र प्रमुख असावा हेही या चळवळीचे एक रूप ठरणार हे उघड होते. आणि राष्ट्र धोक्यात आहे, धर्म धोक्यात आहे अशा घोषणा करून निर्माण होणाऱ्या संघटना आक्रमक ठरणार हेही उघड आहे. इत्तहादुल मुसलमीनचे कार्य जोराने सुरू होताच जागोजाग हिंदूवरील आक्रमणे वाढली. निजामाला जागृत व संघटित मुसलमान आपल्या पाठीशी उभे आहेत हे चित्र हवे होते. पण मुसलमानांनी स्वतःला सार्वभौम समजावे आणि निजामाला घटनात्मक प्रमुख मानावे हे मात्र नको होते. त्याला हिंदूंच्यामधील नवजागृती नको होती पण मुसलमानी आक्रमणामुळे हिंदूंनी चिडून पेटून उठावे हेही नको होते. इत्तहादुल मुसलमीन ही संघटना बलवान असावी, झुंजार असावी असेही निजामाला वाटे. शिवाय ती आपल्या हातातील बाहुलं असावी असेही वाटे.

 हिंदू समाजावर आक्रमणे वाढू लागताच हिंदू समाजातील प्रतिकाराची भावना जागी होऊ लागली. अनेक ठिकाणी मुसलमानांनी आर्य समाजाच्या केंद्रावर हल्ले करून तेथील होमकुंडे फोडून टाकली. जत्रांना आणि देवळांना उपसर्ग देणे सुरू झाले. मुसलमानांच्या वागण्या-बोलण्यात अधिक कडवेपणा आणि अधिक आक्रमकता दिसू

हैदरावाद-विमोचन आणि विसर्जन / ४६