पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/47

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 तो मुसलमान नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी उरलेल्यांच्यावर येऊन पडे. या दृष्टीने एक घटना म्हणून नांदेडचीच जुनी गोष्ट सांगता येईल.

 कविवर्य दे. ल. महाजन यांचा एक भाऊ उडाणटप्पू व भटक्या असा होता. हा त्यांचा भाऊ एक दिवस आजारी अवस्थेत घरी परतला. या भावाच्या विषयी लोक म्हणत की त्याने मुसलमान धर्म स्वीकारला आहे. पण या भावाने मरताना कविवर्य महाजन यांना असे सांगितले की, 'मी कधीही मुसलमान धर्म स्वीकारलेला नाही, मी हिंदूच आहे. माझी उत्तरक्रिया हिंदू पद्धतीने करा.' महाजनांनी ती केली म्हणून नांदेडच्या ब्राह्मणांनी त्यांच्यावर जातिबहिष्कार घातला. महाजन जहागिरदार असूनसुद्धा अन्यायाविरूद्ध दाद मागू शकले नाहीत कारण कायद्यानुसार ज्याच्याविषयी मुसलमान असल्याचा वहीम आहे तो कधीही मुसलमान नसल्याचा पुरावा महाजन कुठून देणार, स्त्रियांच्या अपहरणाचे प्रकार अधूनमधून सतत घडत. मुसलमानी आक्रमणाची जनतेला सवयच इतकी झाली होती की त्याविरुद्ध प्रतिकार करण्याची हिंमतच नव्हती.

 हैदराबादेत हिंदूंची परिस्थिती अशी वाईट होती यावरून मुसलमानांची परिस्थिती फार चांगली होती असे अनुमान काढणे बरोबर होणार नाही. मुसलमानांच्यामध्ये धर्मवेड होते, अरेरावी होती, स्वतःला राज्यकर्ते समजण्याची त्यांची रीत होती, पण बहुसंख्यांक मुसलमान दरिद्री आणि हलाखीचे जीवन जगत होते. मुस्लिम समाजाचे जीवनमान उंचावे यासाठी निजामाने फारसे काही केलेले नव्हते. टांगेवाले, हमाल, शेतमजूर, पानवाले अगर घरगुती नोकर हेच बहुसंख्य मुसलमानांचे जीवन होते. या परिस्थितीला हिंदू आणि मुसलमान यांच्या संघर्षाचा रंग येणे अपरिहार्य होते. म्हणून गांधीजी हैदराबाद संस्थानात राजकीय कार्य सुरू करण्यास तयार नव्हते. बॅरिस्टर रामचंद्र नाईक, धर्मवीर वामन नाईक, केशवराव कोरटकर, काशिनाथराव वैद्य इत्यादी अनेक मंडळींची इच्छा राजकीय कार्य हैदराबादेत सुरू व्हावे अशी होती.पण वरून परवानगी मिळत नव्हती. हैदराबादेत शैक्षणिक व सामाजिक कार्यच तेवढे करावे, आताच राजकारणाकडे वळू नये असे वरिष्ठ नेते म्हणत. त्यामुळे राजकीय संघटन आणि राजकीय मागण्या संस्थानात सुरू झालेल्या नव्हत्या. नव्या पद्धतीने विचार करणारा, राजकारणाविषयी जागरूक असणारा तरुण वर्ग बराच अस्वस्थ झालेला होता पण त्याला अजून निश्चित कार्य सापडलेले नव्हते. केशवराव कोरटकर यांनी हैदराबाद संस्थानभर आर्यसमाजाचे कार्य बरेच वाढवीत नेलेले होते; समाजसुधारणा

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ४५