पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/238

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हौतात्म्य पत्करले तर ते मला आवडेल. पण हातात शस्त्र घेऊन तुम्ही ते न्यायासाठी वापरलेत तर तीही गोष्ट उचित आणि रास्त कारणासाठी होती असे मी मानीन. कन्हैयालाल मुन्शी काय सांगतात त्या प्रश्नाला यापुढे मुळीच किंमत नाही. इथवर मी ठळक ठळक बाबी सांगत आलो. सर्व आंदोलनाचा तपशीलवार जमीनदाराला इतिहास यापेक्षा फार मोठा आहे. तो सर्व लिहावयाचा तर सात-आठशे पानांचा ग्रंथच लिहावा लागेल. तो लिहिला जाईल तेव्हा जावो. पण त्यातला ठळक भाग तरी आपल्यापुढे मांडणे आवश्यक आहे असे मला वाटते. मी तो यथाशक्ति मांडला आहे. महत्त्वाचा असाही पुष्कळ भाग अनुल्लेखित राहिला. कारण वेळ नाही. जो राहिला तो भाग महत्त्वाचा नाही असे मी मानत नाही; तुम्ही मानू नये. या व्याख्यानामुळे काहीजणांना तरी जुना काळ स्मरला असावा. त्या काळची जी मंडळी, केवळ अंधारच समोर दिसत असताना बलिदानासाठी लढ्यात उतरली होती त्यामध्येच आमचे भांगडियाजी होते. त्यांच्या स्मृतीस वंदन करून मी इथे थांबतो.

***

(समाप्त)
हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /२४०