पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/237

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आता निजाम सरकार लौकरच भारतात विलीन होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. म्हणजे विलीन व्हायचे अजून शिल्लक राहिले आहे. असेही स्वयंशहाणे असतात.कारण मुन्शींनी रेडिओवर बोलण्यासाठी जे भाषण निजामाला लिहून दिले त्यात लिहिले आहे की, भारताच्या फौजा या मित्रराष्ट्राच्या फौजा असल्यामुळे आम्ही त्याचे स्वागत करतो. लौकरच शांततेच्या वातावरणात भारत आणि हैदराबाद यांचे चिरंतन संबंध कसे होतील याच्या वाटाघाटी चालू होतील. या दृष्टीने मी जुन्या मंत्रिमंडळाचा राजीनामा स्वीकारून नवे मंत्रिमंडळ प्रिन्स ऑफ बेरार याच्या पंतप्रधानत्वाखाली जाहीर करीत आहे. इत्यादी.

 या मंत्रिमंडळात मुसलमान सदस्य कोण घ्यावेत असा सल्ला निजामाने मुन्शींना विचारला. त्यांनी तो दिलाही. एक सेनापती एल.इद्रूस. दुसरे होशियारजंग. तिसरे अबुल हसन सैयदअली. हे अली का? तर सज्जन आणि संयमशील आहेत म्हणून. कोण हे अली? तर इत्तेहादुल मुसलमीनच्या अध्यक्षपदावरून निजामाने बहादुर यारजंग यांना दूर केल्यावर व कासिम रझवीच्या आधी हे त्या संस्थेचे अध्यक्ष होते. कन्हैयालाल मुन्शींनी आपले प्रतिनिधी म्हणून मंत्रिमंडळात सुचविले ते हे. असो. मुन्शींची राजकारणी पात्रता आणि निष्ठा याविषयी एवढे पुरे. त्यांना बडतर्फ करावे लागले यात सारे आले.

 आता या मुन्शींनी जे पुस्तक लिहिले आहे त्यात अनेक आरोप आहेत. त्याच्या विश्वासार्हतेविषयी पाहू. हे आरोप म्हणजे पुस्तकाचा ‘सुरस' भाग आहे. मुन्शी म्हणतात जनता बी.रामकृष्णराव यांच्याबरोबर होती. हे खोटे आहे. मुन्शी म्हणतात स्वामीजींची लोकप्रियता घसरली होती. हे त्याहून साफ खोटे आहे. मुन्शी म्हणतात, स्वामीजींनी अहिंसक लढ्याचे आश्वासन पटेलांना दिले होते. हे धादांत असत्य आहे. मुन्शी म्हणतात हिंसक लढे काँग्रेसला बदनाम करण्यासाठी आत शिरलेले कम्युनिस्ट करीत होते. ही शुद्ध थाप आहे. मुन्शींनी त्यांचा इतिहास बहुधा निजामाच्या गोटातच जमा केला असावा.

 भारतामध्ये ज्या सशस्त्र आंदोलनाची जबाबदारी संस्थानी काँग्रेसने जाहीरपणे आपली म्हटली असा एकमेव लढा हैदराबादचा आहे. या सशस्त्र लढ्याला स्वामी रामानद तीर्थानी गांधींची संमती मिळविली होती. गांधींनी हे सांगितले होते : इतर सर्व लोक अत्याचारापुढे भेकडासारखे पळून जात असताना तुम्ही अहिंसेने लढलात आणि

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /२३९