पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/233

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अभ्यास आपण केला तर बरे.

 नेहरूंनी काळजी घेतली होती म्हणून निजामाला चोरट्या मार्गाने शस्त्रे आयात करावी लागली. झेकोस्लोव्हाकियाने पोर्तुगालला शस्त्रे दिली. पोर्तुगालने ती आपली भूमी गोवा इथे उतरवून घेतली. गोव्यातून ती शस्त्रे विमानाने हैदराबादला चोरून पोचविण्याचे काम प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय तस्कर सिडने कॉटन याने केले. विमानातून जातील अशीच हत्यारे निजाम आणू शकला. तोफा, रणगाडे, रणगाडेविरोधी तोफा, विमान विरोधी तोफा अशी अवजड हत्यारे निजामाला मिळू शकली नाहीत. ती अधिकृतरीत्या आणायला परवानगी नव्हती. चोरून आणता येत नव्हती म्हणून निजामाची कोंडी झाली. या अवस्थेमध्ये एकवीस मार्च अठेचाळीसला शेवटी माऊंटबॅटन गेले. राजगोपालाचारी गव्हर्नर जनरल झाले. त्याच्या पुढच्या आठवड्यात अचिनलेक गेले व जनरल करिअप्पा हे भारताचे सरसेनापती झाले. हे सरसेनापती झाल्याबरोबर पुढच्याच आठवड्यात हैदराबादभोवती प्रचंड आर्थिक कोंडी उभारण्यात आली. हैदराबादचे नाणे हे हिंदुस्थानात व आंतरराष्ट्रीय बाजारात बेकायदा करण्यात आले. निजामाचे म्हणणे पडले की त्याच्या नाण्याला जगभर मान्यता असल्याने ते बेकायदा ठरविण्याचा अधिकार भारत सरकारला नाही. भारत सरकारचे म्हणणे की हैदराबाद हे एक संस्थान असल्यामुळे त्याचे हिंदुस्थानबाहेरचे सर्वच संबंध नियंत्रित करण्याचे संपूर्ण अधिकार भारत सरकारला आहेत. हैदराबादचे वीस कोटी रुपये स्वीस बँकेत होते. ते त्याने पाकिस्तानला मदत म्हणून देऊ केले होते. भारत सरकारने स्वित्झर्लंडला कळविले की त्यातला अधेलाही जर पाकिस्तानला गेला तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय करारांचा भंग केला म्हणून राष्ट्रसंघापुढे खेचू. स्वित्झर्लंडच्या भूमिकेला जी राष्ट्र पाठिंबा देतील त्या सर्वांशी व्यापारी संबंध तोडू. इंग्लंडने या भूमिकेत आम्हाला पाठिंबा दिला नाही तर ब्रिटिश राष्ट्रकुलातून बाहेर पडू. त्यामुळे इंग्लंडने स्वित्झर्लंडला सांगितले की यातली एकही पै पाकिस्तानला स्वित्झर्लंडने वर्ग केली तर ते स्वित्झर्लंडचे कृत्य इंग्लंड व भारत विरोधी शत्रुत्वाचे कृत्य मानले जाईल. क्लेमंट ॲटलीला असे सांगण्यात आले की, संस्थानला विदेश संबंध जोडता येणार नाहीत हा तुमचा करार आहे. आम्ही त्याचे वारस आहो. तुमचाच करार तुम्ही मोडला तर भारतात जे तीनशेपंचेचाळीस कोटी ब्रिटिश भांडवल आहे त्याचे आम्ही राष्ट्रीयीकरण करून टाकू. त्याचा कोणताही मोबदला देणार नाही. इंग्लंडसमोर प्रश्न असा की हिंदुस्थानला राष्ट्रकुलाबाहेर जाऊ

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /२३५