पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/227

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

Accession) हे शब्द बदलावेत आणि सहकार्याच्या वाटाघाटी (Instrument of Association) हे शब्द वापरावे. हेही भारत सरकारने मान्य केले. पण निजामाचे म्हणणे असे की सहकार्य (Association) या शब्दाने गैरसमज होण्याचा संभव आहे. त्यामुळे जैसे थे (Stand still Agreement) असे शब्द वापरावे. तेही हिंदुस्थान सरकारने मान्य केले. या जैसे थे कराराची कलमे काय असावीत हे ठरले. ऑक्टोबर वीसला हैदराबादचे शिष्टमंडळ सर्व कलमे घेऊन परत आले. पंचवीस ऑक्टोबरला हैदराबाद सरकार आणि दिल्ली येथून एकाच वेळी सह्या केल्या जातील असे ठरले. आणि बावीस ऑक्टोबरला निजामाने माऊंटबॅटनला तार पाठविली. अजून शंकेच्या काही जागा आहेत. वाटाघाटीची एक फेरी अजून झाल्याशिवाय सही करता येत नाही. मेननने त्यांना उत्तर दिले : वाटाघाटी संपल्या असून सहीचा दिवसही ठरला आहे. आता फेरविचार करता येणार नाही असे आमचे मत आहे. तरीही काही बोलावयाचे असेल तर पंतप्रधान छत्तारींना पाठविण्याची तारीख कळवायला निजामाने टाळाटाळ केली. नंतर अठ्ठावीस ऑक्टोबरला निजामाने भारत सरकारला कळविले की वाटाघाटी पुन्हा उघडण्याचे तुम्ही मान्य केल्याशिवाय छत्तारी येणार नाहीत. भारत सरकारने कळविले, मग वाटाघाटी फिसकटल्या असे आम्ही जाहीर करतो. त्यावर निजामाने कळविले तुम्ही असे जाहीर केलेत तर लगेच आमचे शिष्टमंडळ पाकिस्तानशी वाटाघाटी करण्यासाठी जाईल. तेव्हा वाटाघाटी फिसकटल्या असे जाहीर करणे आम्हास संमत नाही. आपणाला वाटेल हा काय तमाशा चालू आहे? वाटाघाटी अशाच चालतात. त्या लक्षात यायला हव्या असतील तर सर्व तारखा लक्षात घ्या. वीस ऑक्टोबर, बावीस ऑक्टोबर, चोवीस ऑक्टोबर, पंचवीस ऑक्टोबर, सव्वीस ऑक्टोबर अशा या क्रमाने चालून तारखा आहेत. चोवीस ऑक्टोबरचे सांगायचे राहिले. या दिवशी सरदार पटेलांनी निजामाला पत्राने कळविले आहे - तुमचे ताजे पत्र पोचले. त्याचा अभ्यास करायला पंधरा दिवस लागतील. तेव्हा वाटाघाटी फिसकटल्या की नाही हे ठरवायलाही पंधरा दिवस लागतील. आपण तूर्त थांबू. बावीस ऑक्टोबरला (सत्तेचाळीस) पाकिस्तानी फौजेने काश्मीरवर हल्ला केला आहे. पाकिस्तान हल्ला करणार याची माहिती निजामाला वीस ऑक्टोबरला नाही. त्यामुळे शिष्टमंडळ वाटाघाटी पूर्ण करून आणि सहीची तारीख ठरवून परतते. पण पाकिस्तानचे सैन्य शिरले हे कळताच निजाम ठरवितो की आता कदाचित पाकिस्तान भारताचा पराभव करील. तर

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /२२९