पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/220

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कारवाईसाठी नियुक्त झाल्या. एका तुकडीचे नेते आवासाहेब लहानकर (हे पुढे चालून नांदेड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे सभासद (M.L.C.) आणि डोंगरखेडा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष झाले.) दुसऱ्या तुकडीचे नेते साहेबराव वारडकर. (हे कित्येक वर्ष नांदेड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते व सध्या लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे सभासद आहेत.) तिसऱ्या युनिटचे नेते नागनाथ परांजपे. चौथ्या युनिटचे नेते रघुनाथ रांजणीकर. पाचव्या तुकडीचे नेते अनंत भालेराव. हे तेव्हा सेलूमध्येच शिक्षक होते. या सगळ्या मंडळींनी ठरलेल्या योजनेनुसार संपूर्ण कार्यवाही पार पाडली. सगळे पैसे बैलगाड्यांत भरले आणि उमरखेडला सुरक्षित नेऊन पोचविले. त्या वेळी सतत रेडिओ लावून बसण्याचे काम भगवंतराव गांजवे आणि भुरवरे यांच्याकडे होते. मुद्दा हा होता की पंचनामा झाल्याच्या नंतर इतके पैसे लुटले गेले अशी बातमी आकाशवाणीवर येईल तेवढे पैसे तुम्ही आम्हाला आणून दिले पाहिजेत. मध्ये एकही पैसा आम्ही तुम्हाला खाऊ देणार नाही. हे जे पैसे आपल्याबरोबर या सर्व मंडळींनी नेले ते भगवानराव गांजवे यांच्या हवाली केले. भगवानरावांनी ते सर्व मोजून यांना लेखी पावती दिली. पंचनाम्याच्या नंतर जी बातमी आली तीत अमुक पैसे लुटले गेले असा उल्लेख आहे. गांजवे यांच्याकडे आलेल्या रकमेची बेरीज एवढी आहे. या दोघांत तीनशेतीस रुपयांचा फरक होता. हे तीनशेतीस रुपये काय झाले याचा शोध करता असे सिद्ध झाले की ते चिल्लरच्या रूपात होते. आमच्या मंडळींनी फक्त नोटाच आणल्या होत्या. मग चिल्लरचे काय झाले? बँक उघडल्यावर पंचनामा होण्याच्या आत चिल्लर ज्याच्या नजरेला पडली त्यांनी ती खिशात घातली असणार.

 आमच्या मंडळींना बँकेमध्ये सोने असते हे माहीत नव्हते. त्या दिवशी बँकेत दीड हजार तोळे होते. हे तिजोरीत (Vault) होते. आमची मंडळी हे न लुटता आली. कारण ते लुटण्याचा आदेश नव्हता. त्यांना जेवढा आदेश होता तेवढेच त्यांनी लुटले. सारे सोने बँकेत सुरक्षित सापडले. आलेले पैसे होते त्याची मोजणी, मी आता ज्या कॉलेजचा प्राचार्य आहे ते कॉलेज चालविणाऱ्या संस्थेचे सचिव भगवानराव गांजवे यांनी गोधाजीराव मुरवरे, त्यांच्या पत्नी माई मुरवरे आणि त्यांची विधवा बहीण यांच्यासमोर केली. नंतर ते पैसे तिथून उचलून पुण्याच्या मार्गे सोलापूरला नेले. सोलापूरला आमच्या कृतिसमितीचे प्रमुख कार्यालय होते. तेथे फुलचंद गांधी आणि दुसरे साक्षीदार यांच्या साक्षीने ते पैसे दिगंबरराव बिंदू आणि गोविंदराव श्रॉफ यांच्या

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /२२२