पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/219

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तेथून ते सोलापूरला गेले. त्यापूर्वीच त्यांनी त्यांची इस्टेट विकून सोलापूरच्या बँकेत पैसे जमा करून ठेवलेले होते. ते पैसे काढले आणि कापसाच्या व्यापारास आरंभ केला. त्यात ते बुडाले. दहाबारा लाखांचे उत्पन्न असणारा हा आर्यसमाजी व्यापारी संपूर्ण दरिद्री झाला. नांदेडला पीपल्स कॉलेज स्थापन झाल्यावर हे त्या कॉलेजात स्वयंपाक करणाऱ्यांचा प्रमुख म्हणून वर्ष-सहा महिने होते. तिथून त्यांनी गुजराथेत हॉटेल काढले. परवा स्वातंत्र्य संग्रामाच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही धनजी पुरोहितांना गुजराथेतून उमरीला बोलावून घेतले, त्यांचा सत्कार केला. पण त्यांचे म्हणणे असे की तुम्ही दिलेले पैसे आणि फंड मी घेणार नाही. मी लाखो रुपये कमावणारा आणि कार्यकर्ते जगविणारा माणूस आहे. माझ्या नशिबाने फटका खाल्लेला आहे. मी आता माझ्या खेड्यात माझे हॉटेल चालवत उरलेले आयुष्य काढीन. मला कशाचीही गरज नाही; राजकीय महत्त्वाकांक्षा नाही. तर असा हा थोर माणूस.

 नांदेड जिल्ह्यामध्ये लष्करातून नुकतेच निवृत्त झालेले एक गृहस्थ रघुनाथ रांजणीकर. त्यांनी ठरविले की बँक लुटायची हा धनजी पुरोहित यांचा मुद्दा बरोबर आहे. तेव्हा बँक कशी लुटायची याचा संपूर्ण अभ्यास केला पाहिजे. हे लष्करातले विद्वान असल्यामुळे कोणताही हल्ला करायचा असेल तर नियोजन कसे पाहिजे याचे तज्ज्ञ. म्हणून त्यांनी नकाशे डोळ्यांपुढे ठेवले. सडका कुठून कुठे जातात, गाड्या कोठून कोठे जातात; रेल्वे कोठून कोठे जातात; तारा कोठून येतात-जातात याचा तक्ता तयार केला. या साऱ्या घटना चाळीस साली घडणार असून अजून आमचा लढा सुरू झालेला नाही. पण सुरू होईल तेव्हा तो सशस्त्र असणार. सशस्त्र लढा असेल तर त्याला शस्त्रासाठी पैसा लागणार. पैसे लागणार असतील तर उमरी बँक लुटून पैसा घेणार, हे या कार्यकर्त्यांचे मत आहे. या हिशोबात आखणी चालू आहे. त्यामुळे जेव्हा सशस्त्र आंदोलनाला आरंभ झाला तेव्हा उमरी बँक लुटण्याला वरून परवानगी मिळाली. तेव्हा आमच्याजवळ गाड्या केव्हा येतात, जातात; तारा कुठे आहेत, सडका कुठे आहेत, त्या अडविण्यासाठी कुठे झाडे तोडावयाची, बँक लुटल्याची बातमी बारा तासपर्यंत नांदेड अगर निझामाबाद येथे पोचू नये यासाठी काय करायचे याची योजना तयार होती. कारण लुटलेला सगळा पैसा बैलगाडीमध्ये घालून उमरखेडपर्यंत नेणे आवश्यक होते. कुणाजवळ जीप अगर मोटारी नव्हत्या. आनंदाची गोष्ट होती की निजामाच्या फौजेजवळही जीप गाड्या नव्हत्या. कार्यकर्त्यांच्या पाच तुकड्या या

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /२२१