पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/217

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सरकारवर टीकास्त्र सोडले. निजामाचे मोठेपण सांगितले. कत्तलीच्या धमक्या दिल्या. हे सारे तासभर चालल्यावर तो खाली बसला. वल्लभभाई त्याचे सर्व व्याख्यान एकही शब्द न उच्चारता ऐकत होते. तो खाली बसल्यावर वल्लभभाई म्हणाले, "तुमचे काय म्हणणे आहे ते मी ऐकले. पण माझ्या मनात काही शंका आहेत त्या विचारतो."

 “विचारा".

 "तुमच्या म्हणण्यात एक असा मुद्दा आहे की तुम्ही हैदराबादमधील एक कोटी चाळीस लक्ष हिंदूंची कत्तल कराल."

 "हो. ती माझी प्रतिज्ञा आहे."

 "एक कोटी चाळीस लाख हिंदूंची कत्तल तुम्ही करीत असाल तेव्हा आम्ही काय करू अशी तुमची कल्पना आहे?"

 तेव्हा रझवी एकदम घाबरला.

 तो म्हणाला, "तुम्ही मला धमकी देत आहा. हे बरोबर नाही. तुम्ही मला हैदराबादला जाऊ दिले पाहिजे."

 “उद्याच्या विमानात तुमची जागा राखीव असेल. तुम्हाला विमानात बसवून दिले जाईल. तुम्ही हैदराबादला सुरक्षित उतरावे अशी माझी इच्छा आहे. नंतर तुम्ही निजामाची भेट घ्याल तेव्हा त्यांची मुलेबाळे आणि प्रकृती यांची चौकशी मी केली असे त्यांना सांगा. त्यांचे कल्याण व्हावे अशीच माझी भूमिका आहे. त्यांना माझा निरोप सांगा की हिंदूंच्या कत्तलीचा विचार त्यांच्या डोक्यात येईल तेव्हा ती सुरू झाली तर आम्ही काय करू याचा विचारही त्यांनी करावा. आता या. मला आणखी काही बोलायचे नाही."

 रझवी आणि पटेल यांच्या या भेटीची माझी माहिती अशी आहे. कन्हैयालाल मुन्शींनी जी माहिती दिली आहे त्याप्रमाणे रझवी गेला आणि सरदार पटेलांना म्हणाला, “मी तुमचे हृदयपरिवर्तन करायला आलो आहे."

 “ज्याचे हृदय विषाने भरलेले आहे त्याला हृदयपरिवर्तनाची गरज असते. मला हृदयपरिवर्तनाची गरज आहे असे मला वाटत नाही."

 “माझे अंतःकरण शुद्ध आहे असे पटवून द्यायला मी आलो आहे."

 यावर वल्लभभाई पटेल गप्प बसले. शब्दांच्यापेक्षा मौन अत्यंत कडवट कसे करावे याचे वल्लभभाई हे तज्ज्ञ होते.

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /२१९