पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/212

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गाव रझाकारांनी घेरले आणि लुटले. गावात म्हाताऱ्या आणि मुली सोडून सव्वीस बायका होत्या. त्या सर्वांना रझाकारांनी नागवे केले आणि त्यांची गावातून धिंड काढली. नंतर या बायांना चौकात आणून उभे केले. नंतर गावातल्या सर्व पुरुषांना आणले. बायांसमोर रांगेत उभे केले आणि गोळ्या घालून ठार मारले. अशा प्रकारचे हे अत्याचार आहेत. हे आपणाला सर्वत्र पाहावयास मिळतील. अमक्या ठिकाणी अमक्याला ठार मारले. तमक्या गावी तमकीवर बलात्कार केला. फलाण्या ठिकाणी अमुक गाव जाळले. हे रोजचेच झाले. गाव जाळणे, शेत जाळणे, माणसे मारणे, अब्रू लुटणे असे हे सत्र जून सत्तेचाळीसच्या थोड्याआधी सुरू झाले ते पोलिस कारवाईपर्यंत चालले. या अत्याचारातील खुनाला, वधाला, मृत्युसत्राला आरंभ झाला तो नांदेड जिल्ह्यापासून. या जिल्ह्यात बिलोलीजवळ अर्जापूर नावाचे गाव आहे. या गावी गोविंदराव पानसरे नावाचे काँग्रेसचे कार्यकर्ते होते. त्यांना रझाकारांनी घेरले आणि मारले. या हौतात्म्याची कहाणी मी तपशिलाने सांगतो. महत्वाची गोष्ट अशी आहे की गोविंदराव वाचू शकले असते व त्यांना वाचविण्याचा प्रयत्नही झाला. त्याचे असे झाले. गोविंदराव बिलोलीतून निघाले आणि अर्जापूरच्या दिशेने चालू लागले. त्यांच्यावरोबर चारपाच कार्यकर्ते होते. या कार्यकर्त्यांपैकी एक पुंडलीकराव पाटील नावाचे होते. (हे पाटील पुढे बावनच्या निवडणुकीत दिगंवरराव बिंदूंच्या विरोधी उभे होते). तर हे पानसरे, पाटील आणि कार्यकर्ते जात असताना गावाच्या बाहेर तीन-चार मैलांवर त्यांना शेपन्नास रझाकारांनी घेरले आणि विचारले, “तुमच्यामध्ये पानसरे कोण आहेत?" तेव्हा पुंडलीकराव पाटील पुढे झाले आणि म्हणाले, “मी पानसरे, पाहा. माझ्या अंगावर खादीचे कपडे आहेत. डोक्यावर खादीची टोपी आहे." हे म्हटल्याक्षणी तरवारीचे अनेक घाव पुंडलीकराव पाटलांच्यावर पडले. पाटील खाली कोसळले. त्यांच्या हातातील कंदीलही खाली पडला. तो उचलून गोविंदराव उभे राहिले व रझाकारांना म्हणाले, “तुम्हाला काही अकला आहेत की नाहीत? पानसरेच्या डोक्यावर कधी टोपी नसते. बोडखा मी आहे. पत्र माझ्याजवळ आहे. अंगावरचे माझे कपडे पाहा. हा कंदील घ्या. चेहरे नीट पाहून घ्या. भलत्याच माणसाला मारू नका. पानसरे मी आहे.” त्यातला एक रझाकार पानसरेंना ओळखत होता. तेवढ्यात पुंडलीकराव पडल्या पडल्या धडपडत ओरडत होता. "तो मला वाचविण्यासाठी खोटे बोलतो आहे. पानसरे मी आहे." पण ओळखणाऱ्या रझाकाराने खरी ओळख दिली व पानसरे मारले

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /२१४