पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/209

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आलेला लढा प्राणांतिक आहे हे आम्हाला दिसत होते. या अधिवेशनात बाबासाहेब परांजपे यांनी मराठवाड्यातील तरुणांना उद्देशून व्याख्यान दिले आहे. त्या व्याख्यानात ते म्हणाले की 'देहाची उंची साडेतीन हात आहे हे यानंतर तुम्ही विसरावे. ती उंची तीनच हात आहे, अर्ध्या हात उंचीचे डोके देहावर नाही असे समजून महामृत्युंजयाचा जप करीत तुम्ही निर्भयपणे चाला. या लढ्यात तुमच्यापैकी किती लोक मारले जातील याचा नेम नाही. जिवंत राहतील त्यांना साडेतीन हातांचा देह मिळेल. जे मरतील ते देशाच्या कारणासाठी मेले असे मानावयाचे.' या व्याख्यानाला मी स्वतः हजर होतो आणि त्या काळात बाबासाहेब फारच जाज्वल्य बोलत असत. त्यांचे श्रोते भयंकर भडकून उठत असत.

 ही आंदोलनाची तयारी एका बाजूने झाली होती. दुसऱ्या बाजूने वाटाघाटी चालू होत्या. दोन जूनला माऊंटबॅटनची घोषणा झाली. अकरा जूनला काँग्रेसने ती स्वीकारली. बारा जूनला निजामाच्या स्वातंत्र्याचे फर्मान त्याने काढले. चौदा जूनला निजामाने माऊंटबॅटनला कळविले. पंधरा ऑगस्टला भारतात तुम्ही नसाल. तेरालाच तुम्ही जाल. त्याच्या आत पुढील व्यवस्थेच्या दृष्टीने तात्पुरता करार व्हावा असे आम्हाला वाटते. वाटाघाटी करायला आम्ही येऊ इच्छितो. इकडे आम्ही म्हणजे संस्थानी काँग्रेसने अठरा जूनला लढ्याचा ठराव हैदराबादला पास केला. ज्या अवस्थेत हे आंदोलन झाले त्याच्या मागेपुढे असणाऱ्या ठळक ठळक बाबी मी आपल्याला सांगितल्या. इथून पुढे जाण्यापूर्वी, मी आपल्याला काल जे सांगितले ते आपण लक्षात ठेवले पाहिजे. ते असे की हैदराबादच्या या मुक्ति आंदोलनात जनतेचा वाटा फार मोठा आहे. या लढ्याला जेवढी तीव्रता आणि उग्रता हैदराबादमध्ये होती तेवढीच भारताच्या संपूर्ण लढ्यात दुसऱ्या कुठल्या एका जागी होती असे दाखविता येणार नाही. तुरुंगातील सत्याग्रहींनी संख्या वीस हजार होती. ज्यांनी भूमिगत काम केले, सशस्त्र आंदोलनात भाग घेतला अशा कार्यकर्त्यांची संख्या आणखी वीस हजारांच्या जवळपास होती. या सशस्त्र आंदोलनाचे सारे तपशील मी आपल्याला सांगणार नाही. कारण ते सांगायचा अधिकार असणारी माणसे वेगळी आहेत. त्यांनीच तो सांगितला पाहिजे, मी फक्त त्याचा धावता आढावा घेत आहे.

***

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /२११