पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/208

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लीग, गांधी व जीना यांच्यात तडजोड झाली नाही तर फेब्रुवारी अठ्ठावीसला सगळे प्रांत स्वतंत्र होतील. वायव्य सरहद्द प्रांत जर पाकिस्तानात न येता स्वतंत्र झाला तर तो मागाहून पाकिस्तानात येणार नाही. तो अफगाणिस्तानातही जाईल. अशीच परिस्थिती आली तर मग पंजाब व सिंध एकत्र राहतील याची खात्री नाही. म्हणजे पाकिस्तानचे अस्तित्वच संपले. हिंदुस्थानची फाळणी होईलच पण पाकिस्तानची निर्मिती होणार नाही. त्यामुळे जीनांना घाई सुटली. त्यानंतर वाटाघाटीची सत्रे घडली. काँग्रेसने आणि जीनांनी फाळणीला मान्यता दिली. माऊंटबॅटनने दोन जूनला त्याची योजना मांडली होती. अखिल भारतीय काँग्रेसची बैठक अकरा जूनला मुंबईला भरून तिने माऊंटबॅटन योजनेला मान्यता घोषित केली होती. दोन आणि अकरा जूनच्या या घोषणेनंतर असे ठरले की पंजाबची व बंगालची विभागणी केली जाईल. अर्धा पंजाब आणि अर्धा बंगाल पाकिस्तानला दिला जाईल. पाकिस्तान नावाचे नवे राज्य तयार केले जाईल. सर्व संस्थानांवरचे ब्रिटिश सार्वभौमत्व संपेल. संस्थानांना सर्व करारांतून मोकळे केले जाईल. नंतर या संस्थानिकांना योग्य वाटेल ते त्यांनी करावे. कुठल्याही राज्यात जावे अगर स्वतंत्र राहावे. याच तारखांना हीही घोषणा करण्यात आली की, तेरा ऑगस्ट सत्तेचाळीसला ब्रिटिश अधिसत्ता संपुष्टात येते आहे. हे अशासाठी लक्षात घ्यावयाचे की भारतीय स्वातंत्र्य पंधरा ऑगस्टला अस्तित्वात येणार हे दोन जून व अकरा जून या कालावधीत सर्वांना स्पष्ट झाले होते. यानंतर सहा दिवसांनी सोळा, सतरा, अठरा जूनला संस्थानी काँग्रेसचे पहिले अधिवेशन झाले. या पहिल्या अधिवेशनाच्या वेळी पाकिस्तान दोन महिन्यात निर्माण होणार हे निजामासह सर्वांना माहीत झाले होते. हिंदुस्थानही स्वतंत्र होणार, पंडित नेहरू त्याचे पंतप्रधान होणार याही गोष्टी स्पष्ट होत्या. फक्त पहिले गव्हर्नर जनरल कोण होणार हे स्पष्ट नव्हते. स्वतंत्र राहण्याचा हक्क हैदराबादला मिळालेला आहे हे स्पष्ट होते. दोन जूनला माऊंटबॅटनची घोषणा, अकरा जूनला काँग्रेसने केलेला त्या घोषणेचा स्वीकार, यानंतर बारा जूनला निजामांनी फर्मान काढले. यात निजामाची भूमिका होती की हैदराबाद, हिंदुस्थान अथवा पाकिस्तान यात कुठेच जाणार नाही व स्वतंत्रच राहणार आहे. नवे राष्ट्र निर्माण करण्याचा व टिकविण्याचा त्यांचा निर्णय आहे. त्यामुळे सोळा, सतरा, अठराला जेव्हा आंदोलन करण्याचा निर्णय आमच्या अधिवेशनात होत होता तेव्हा त्या ठरावाच्या मागे हैदराबादने स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतलेला आहे ही पार्श्वभूमी होती. त्यामुळे समोर

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /२१०