पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/207

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

काँग्रेसचे स्वरूप जनतेची चळवळ हे होते. कर्नाटकात काही ठिकाणी असे स्वरूप होते, काही ठिकाणी नव्हते. बिदर जिल्ह्यात तर मूळ हेतूला विपरीत असे मुसलमानविरोधी झगड्याचेच रूप होते. मुसलमानांना विरोध यापलीकडे तिथे तत्त्वज्ञानात्मक स्पष्टताच नव्हती. असे हे चित्र सत्तेचाळीस सालापर्यंत येते. सत्तेचाळीसचे अधिवेशन हे हैदराबाद संस्थानी काँग्रेसचे स्वातंत्र्यपूर्व इतिहासातील सर्वांत मोठे अधिवेशन. हे हैदराबादला झाले. सोळा, सतरा आणि अठरा जून या त्या अधिवेशनाच्या तारखा होत्या. अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ होते. अधिवेशनाला दीड लक्ष लोक हजर होते (म्हणजे गांधीजींना अपेक्षित असा लोकसंख्येचा एक टक्का). या अधिवेशनाने हैदराबाद संस्थानाने संपूर्णपणे भारतात विलीन व्हावे अशी मागणी केली. ही मागणी जर मान्य झाली नाही तर आंदोलन सुरू करावे असा निर्णयही घेण्यात आला. हे घडेपर्यंत मधल्या काही महत्त्वाच्या घटना आहेत त्या आता लक्षात घेऊया.

 पहिली महत्त्वाची घटना लक्षात घ्यायला हवी ती ही की, लॉर्ड वेव्हेल व्हाइसराय असताना ज्या वाटाघाटी भारत व इंग्रज सरकार यांत चालू होत्या त्याचे गुऱ्हाळ (Deadlock) संपतच नव्हते. हे लक्षात आल्यावर वेव्हेल यांना परत बोलावून माऊंटबॅटन यांना हिंदुस्थानात पाठविण्यात आले. माऊंटबॅटन हे शेवटचे गव्हर्नर जनरल आणि व्हाइसराय. मार्च सत्तेचाळीसमध्ये त्यांनी कामाचा ताबा घ्यायचा होता. फेब्रुवारी सत्तेचाळीसमध्ये त्या वेळचे ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट ॲटली यांनी पार्लमेंटमध्ये एक घोषणा केली. कारण ती घोषणा केल्याशिवाय आपण शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल म्हणून जाणार नाही असे माऊंटबॅटन म्हणाले होते. ती घोषणा अशी की ब्रिटनने आपले भारतावरील साम्राज्य संपविण्याचा निर्णय घेतलेला आहे. भारतीय जनतेचे प्रश्न भारताच्या हवाली होतील. हिंदुस्थानवरचा ताबा आणि आमचे सार्वभौमत्व आम्ही संपवीत आहोत. प्रश्न जर नीट सुटला नाही तर आम्हाला वाटेल त्या मार्गाने आम्ही तो सोडवू. पण कोणत्याही परिस्थितीत जून अट्ठेचाळीसच्या नंतर भारताच्या भूमीवर इंग्रजांचे राज्य व इंग्रजांच्या सेना राहणार नाहीत.

 कालमर्यादा एक वर्षाची आहे. त्यामुळे जे वाटाघाटी करीत होते त्यांना त्वरा उत्पन्न झाली. नाहीतर वर्षानंतर सर्व अंधाधुंदी होणार. ॲटली असा गोंधळ निर्माण करू इच्छितील असे जीनांना वाटत नव्हते. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर या घोषणेचा प्रचंड असा आघात झाला. या सर्वांचा अर्थ काय? अर्थ असा की काँग्रेस व मुस्लिम

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /२०९