पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/203

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे. श्रॉफ जमीनदारीच्या विरोधी आहेत हेही तेव्हा उघड झाले. उमरीला श्रॉफ यांनी भूमिकाच अशी घेतली की, राजकीय प्रश्न जरी आपण सोडले असले तरी आपणाला कसेल त्याची जमीन, शेतीची सुधारणा, सावकारशाहीची सुधारणा, सावकारी पाशातून शेतकऱ्यांची मुक्ती अशा जनहितकारक व लोकहितैषी उद्योगाकडे राजकारण वळवायला पाहिजे. गोविंदभाईच्या या मतामुळे काँग्रेसमध्ये जुने आणि नवे अशा संघर्षाला सुरुवात झाली. हा संघर्ष उघड नव्हता पण होता. उमरीच्या परिषदेचे अध्यक्ष काशिनाथराव वैद्य होते. वैद्य परत गेले आणि त्यांनी आंध्र परिषदेचे अधिवेशन घेतले. तेथे त्यांच्या लक्षात आले की, या परिषदेवर रविनारायण रेड्डींचा प्रचंड प्रभाव आहे. रेड्डी हेही जमीनदारांचे कडवे विरोधक. तेथून ते कर्नाटक परिषदेच्या अधिवेशनाला गेले. तेथे काही तरुण जमीनदारविरोधाच्या घोषणा देत होते. पण त्यांचा परिषदेवर फारसा भरवसा नव्हता. तिथून काशिनाथराव वैद्यांनी ही भूमिका घेतली की, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या महाराष्ट्र, आंध्र आणि कर्नाटक प्रांतिक परिषदांमध्ये कम्युनिस्टांनी शिरकाव करून घेतलेला आहे. त्यांना आपण बाहेर काढावयास पाहिजे. या भूमिकेत वैद्यांना जनार्दनराव देसाई, बी. रामकृष्णराव इत्यादींची सहमती होती. एकूणचाळीस सालापासून ही भूमिका सुरू झाली. तिचा परिणाम म्हणून चाळीस साली आंध्र परिषदेचे दोन तुकडे पडले. एक कम्युनिस्टांच्या नेतृत्वाखाली असणारी आंध्र परिषद, दुसरी जमीनदारांना अनुकूल असणाऱ्या नेतृत्वाखालील आंध्र परिषद. एक बिगरकाँग्रेसवाल्यांची आंध्र परिषद, एक काँग्रेसवाल्यांची. असे चित्र तयार झाले. बिगरकाँग्रेस परिषदेमध्ये रविनारायण रेड्डींच्या बरोबर पिव्याळ राघवाराय, राजबहादुर गौड, हैदराबाद शहरचे गुरवा रेड्डी, मकदुम मोईनिद्दिन इत्यादी मंडळी होती. यातील शेवटचे दोघे माझे शिक्षक होते हीही वैयक्तिक गोष्ट ओघात सांगून टाकतो. हे दोघे सिटी कॉलेजमधून नोकरीचा राजीनामा देऊन कम्युनिस्ट पक्षाच्या राजकारणात गेले.

 आंध्र परिषदेप्रमाणे महाराष्ट्र परिषदेमध्येही अशी काही मंडळी होती. मधून मधून असा सूर काढला जात असे की तुम्ही मंडळी आगाऊ धंदे फार करायला लागलात. जमीनदारीच्या विरोधी बोलून आपल्याला करावयाचे काय? जेबाबदार राज्यपद्धतीविषयी बोलून आपणाला करावयाचे काय? हैदराबादच्या आरंभीच्या राजकीय जागृतीपासूनच महाराष्ट्रात जमीनदारविरोधी, वतनविरोधी असा विचार प्रभावी होता. आमच्याकडे अडचणींची गोष्ट ही होती की मराठवाड्यातील नेत्यांमधले गोविंदभाई

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /२०५