पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/201

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खासगीत शिव्या दिल्या. पण गांधी तसूभरही बधले नाहीत. तेव्हा सर्वांनी ही भूमिका घेतली की गांधी नको म्हणतात तर आंदोलन बंद करा. गांधींनी तळच्या मंडळीना खुलासा केला की अजून तुमच्यात जागृती पुरेशी नाही. तेव्हा व्यर्थ आंदोलन चालविण्याची गरज नाही. वरच्या पुढाऱ्यांना त्यांनी समजावून दिले की, त्यांनी दोन बाबी लक्षात घ्याव्यात. एक म्हणजे या आंदोलनाबरोबर जर जातीयवादी राजकारण सुरू झाले तर हेतू आणि धोरणे यांचा गुंता होईल. त्याचा अखिल भारतीय राजकारणावर विपरीत परिणाम होईल. आपल्याला जर ध्येयधोरणाचा गोंधळ करावयाचा नसेल तर हिंदुमहासभा आणि आपण यांची आंदोलने एकाच वेळी चालता कामा नयेत. आता आपले आंदोलन राजकीय आहे. ते धार्मिक उरलेले नाही. त्यामुळे आंदोलन स्थगित. दुसरा मुद्दा मला स्वतः गोविंदभाईंनी समजावून दिला. गांधींना भेटायला आणि वाटाघाटी करायला गोविंदभाईच गेले होते. ते औरंगाबादहून मुंबईला डांगे यांच्यांकडे आणि तेथून डांगे यांच्या सल्ल्याने वर्ध्याला गांधींकडे गेले होते. (डांगे तेव्हा काँग्रेसमध्ये होते व गांधींचे नेतृत्व मानीत होते.) गांधींनी गोविंदभाईंना विचारले ते हे की या आंदोलनातून निजामाचा पूर्ण पाडाव होईल असे गोविंदभाईना वाटते का? हे पहिले आंदोलन आहे. अशी अनेक आंदोलने तुम्हाला करावी लागतील. नंतरच निजामाचा पाडाव होईल. हा केवळ आरंभ आहे. शहाण्या नेतृत्वाचे हे काम आहे की एकदा लढाईला आरंभ केल्यावर आपली सर्व शक्ती संपून जाण्याच्या आत आंदोलन थांबले पाहिजे. आंदोलनात शिक्षा झालेले सत्याग्रही त्यांची निराशा होण्याच्या आत सोडविले पाहिजेत. हे सत्याग्रहीच पुढचे कार्यकर्ते होतील याची काळजी घेतली पाहिजे. आज तुमच्याजवळ कार्यकर्त्यांची चमू आहे ती आठनऊशे लोकांची आहे. यांना तुम्ही नीट सांभाळले तर समजा अजून दोन वर्षांनी आपण नवे आंदोलन सुरू करू तेव्हा चारपाच हजार लोक तुरुंगात पाठवणे तुम्हाला शक्य होईल. तेही आंदोलन निर्णायक ठरेल असे नाही, म्हणून त्या वेळेलाही तुम्हाला योग्य वेळी माघार घ्यावी लागेल. पुन्हा जास्त शक्ती संघटित करून नवे आंदोलन उभारावे लागेल. असे करीत करीत तुम्हाला एखादा दिवस असा निर्माण करावा लागेल की, जेव्हा आपण सत्याग्रह करणाऱ्या मंडळींची नोंद लोकसंख्येच्या टक्केवारीत करू शकू. निदान एक टक्का माणसे तरी तुरुंगात घालण्याची आपली ताकद असली पाहिजे. म्हणजे गांधीजींचे लक्ष्य आहे एक लाख साठ हजार माणसे सत्याग्रह करायला संस्थानात तयार हवी. एक टक्का माणसे

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /२०३