पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/200

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील केंद्र हे आर्यसमाजाचे फार मोठे केन्द्र होते. कामतीकर घराणे, शेषराव वाघमारे आणि त्यांचे भाऊबंद, मुरलीधरराव कामतीकर व त्यांचे सर्व घराणे हे आर्यसमाजाचे प्रमुख नेते. ही सर्वच मंडळी काँग्रेसची. तेव्हा आर्यसमाजाने आंदोलन सुरू कसे केले, मागे कसे घेतले याची वेगळी चर्चा करण्याचे कारण नाही. ही थोर मंडळी काँग्रेसची अनौपचारिक शाखा होती. गरजेनुसार काँग्रेसला शिव्या देण्याचे आणि प्रसंग येताच काँग्रेसच्या मदतीला जाऊन लढावयाचे असे आर्यसमाजाचे रूप आहे. हे रूप विशद करण्यासाठी एवढा वेळ घेतल्यावर मी त्यांच्या आंदोलनाची वेगळी चर्चा करत नाही.

 विद्यार्थी आंदोलनाचीही वेगळी चर्चा करण्याचे कारण नाही. कारण विद्यार्थी आंदोलनातून चालून जी मंडळी आली ती पुढे चालून काँग्रेसमध्ये गेली. अडतीसच्या वंदे मातरम् चळवळीतील बहुसंख्य मंडळी काँग्रेसमध्ये आली आहे.

 हिंदु महासभेने हैदराबादमध्ये काही काळ आंदोलन केले पण नंतर संस्थानच्या राजकारणात काहीही लक्ष घातले नाही. ज्या ठिकाणी लोक अहिंसेने लढत होते तिथे हिंदुमहासभा प्रभावी होऊ शकली नाही हे मी समजू शकतो. पण जिथे मुसलमानांच्या विरुद्ध सरळ सरळ सशस्त्र लढाई चालू होती तिथे हिंदुमहासभा कधीच काही काम करू शकली नाही याचा विचार हिंदुत्ववादी राजकारणांच्या अभ्यासकांनी जरूर केला पाहिजे. हैदराबादच्या लढ्याबद्दल तुम्ही कसेही, कितीही आणि काहीही म्हणालात तरी मुसलमान ज्या अर्थी निजामाच्या साथीला होते त्या अर्थी तो लढा मुसलमानांच्या विरुद्ध होता; तो लढा हिंदूंचा होता; तो लढा हत्यारी होता. पुढे तर सशस्त्र आंदोलनाची उघड जबाबदारीच संस्थानी काँग्रेसने घेतली. तेंव्हा जिथे आंदोलन मुसलमानविरोधी आणि सशस्त्र होते तिथेही काँग्रेसचे निधर्मी राजकीय तत्त्वज्ञानच विजयी झाले; हिंदुत्ववाद विजयी झाला नाही. याच्या कारणांचा शोध केव्हातरी एकदा आपण घेतलाच पाहिजे. अडतीस हा आंदोलनाचा आरंभ असला तरी काँग्रेससाठी नऊशे सत्याग्रही तुरुंगात गेले. आणखी पुढचे शंभर लोक तुरुंगात जाण्यासाठी तयार राहिले तर अचानक एके दिवशी गांधींनी आज्ञा काढून आंदोलन बंद केले. ही गोष्ट कुणालाही आवडली नाही. अनेकांनी गांधींना सांगितले की, असे आंदोलन मध्येच बंद केले तर तो आमचा विश्वासघात होईल. हिंदुमहासभेने गांधीजींचा धिक्कार केला, आर्यसमाजाने धिक्कार केला, काँग्रेसमधील लोकांनी जाहीर धिक्कार केला नाही पण वर्ध्याला जाऊन गांधींना

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /२०२