पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/20

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१९२६ पासून वावरणारी, आरंभीची सेवाभावी संघटना होती. पण १९३० नंतर सबंध भारतात राष्ट्रीय मागण्यांचे दडपण वाढत होते. तीन गोलमेज परिषदा झाल्या व त्यातून अंतिमतः १९३५ चा कायदा अस्तित्वात आला. या कायद्यातले महत्त्वाचे कलम म्हणजे संघराज्य व्यवस्थेचे होते, ते मुळात निझामाला मान्य नव्हते, होणे शक्यच नव्हते. पण उघडपणे नाही म्हणायची सोयच नव्हती. ह्या दृष्टीने तीनही गोलमेज परिषदांतील हैदराबादचे सर सय्यद अकबरी यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळाचे वर्तन व कार्य पटण्याजोगे आहे. ते सबंध राजकीय सुधारणेला शह देणारे होते. त्यात निझामाने जातीने लक्ष घातले होते. त्यातून कायदा तर झाला मग तो बुडवायचा कसा? त्या योजनेतून इत्तेहादुल मुसलमीन संस्थेला हिंदूंची प्रतिरोधी संस्था म्हणून उत्तेजन दिले. या संस्थेच्या नेतृत्वाने सतत भारत सरकारच्या रेसिडेंटचा व त्यांच्या कलाने चाललेल्या मंत्रिमंडळाचा कधी प्रच्छन्नपणे तर कधी उघडपणे धिक्कार केला. का तर जबाबदार राज्यपद्धतीच्या मागणीची लाट थोपवायची होती. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद सगळे मार्ग वापरण्यात आले. स्टेट काँग्रेसवर बंदी येण्याचे कारण केवळ ती सत्याग्रह करते किंवा करेल म्हणून नव्हे तर राजकीय सुधारणाच थोपविण्याचा तो एक आवश्यक भाग होता. पण सगळे एकदम सांगून टाकायचे नसते व निझामाने ते केले नाही. त्यांनी व मंत्रिमंडळाने सतत हिंदू पुढाऱ्यांबरोबर वाटाघाटी केल्या व येथे कौतुकाने व अभिमानाने नोंदवावेसे वाटते की, आमची मंडळी त्या परीक्षेत कसास उतरली. या काळात श्री. काशिनाथराव वैद्य व एम.नरसिंहराव यांचे खरे कर्तृत्व प्रगट झाले. आपला मुद्दा, भूमिका यत्किंचितही न सोडता त्यांनी मुस्लिम समाज, नेते, कार्यकर्ते, राज्यकर्ते यांच्यासमोर सर्वसाधारण तमाम जनतेची जबाबदार राज्यपद्धतीची मागणी वेगवेगळ्या शब्दांत. ठणकावून मांडली. सत्याग्रह बंद असूनही हे जनसंघटनेचे त्यांचे कार्य चालू होते. विशेषतः उमरी येथे झालेले १९४१ चे अधिवेशन त्या दृष्टीने विशेष. ऐतिहासिक मानावे लागेल. त्या वेळी अध्यक्षीय भाषणात श्री. काशिनाथराव वैद्य यांनी आपली सबंध भूमिका संपूर्ण लोकशाही व संपूर्ण स्वातंत्र्य यांच्याजवळ नेऊन ठेवली. कुरुंदकरांनी काही ठिकाणी अशा मंडळींचा उल्लेख "मवाळ" म्हणून केला आहे. तो या सर्व कार्यकर्त्यांना अन्याय करणारा आहे, असे आम्हाला वाटते. सत्याग्रहाच्या वेळी सत्याग्रह, सभेच्या वेळी सभा, शस्त्रासाठी शस्त्र, शेवटी ही साधनेच. हेतू समाजाचे नीतिधैर्य सांभाळून त्याला पुढे रेटीत नेणे. हैदराबादच्या इतिहासाच्या संदर्भात म्हणून १९३९ ते ४६ या कालावधीतील एकूण कार्य मला