पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/198

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हा तरुण पुढारी म्हणजेच आजचे गोविंदभाई श्रॉफ. त्यांचा उदय या बौद्धिकांतूनच झाला. याच वेळी म्हणजे अडतीस सालच्या सुमारास विद्यार्थ्यांनी म्हणजे हिंदू विद्यार्थ्यांनी शिक्षणावर बहिष्कार टाकायला सुरुवात केली. ज्यांनी बहिष्कार टाकला ते सर्वच संस्थानाबाहेर गेले नाहीत. जे असे बाहेर गेले त्यांना उस्मानिया विद्यापीठाची पदवी मिळाली नाही. त्यामुळे ते सरकारी व इतरही नोकऱ्यांना वर्ज्य ठरले आणि त्यामुळे आपोआपच पुष्कळसे राजकीय कार्यकर्ते उपलब्ध झाले. अडतीसमध्ये शिक्षण संपलेल्या अशा कार्यकर्त्यांपैकी एक अनंतराव भालेराव आहेत. दुसरे गोविंदराव देशमुख आहेत. तिसरे व्ही.डी.देशपांडेही आहेत. असे अनेक आहेत. सर्वांची नावे घ्यायला वेळ पुरणार नाही. तर मुद्दा हा चालू आहे की 'वंदे मातरम्' ही जी विद्यार्थ्यांची चळवळ आहे ती याच वेळी सुरू झाली. संस्थानातील वंदे मातरम् चळवळीचे हे मूळ.

 आर्यसमाजानेही याच वेळी म्हणजे अडतीस साली असे ठरविले की आमच्यावर फार मोठे अन्याय होतात म्हणून ओरडायला सुरुवात करायची. त्यामुळे आर्यसमाजाचे सत्याग्रह आंदोलन याच वेळी झाले. आर्यसमाजाने सत्याग्रह करण्यासाठी म्हणून जो मार्ग स्वीकारला तोही मोठा लोकविलक्षण आहे. त्याने एक अगदीच साधी भूमिका घेतली. ती अशी की ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल तिथे मुसलमानांना प्रतिकार करा. या भूमिकेमुळे गुलबर्गा, उदगीर, निलंगा, या तीन ठिकाणी मुसलमानांनी ज्या हिंदू बायकांना पळवून नेण्याचा प्रयत्न केला त्यांना सोडवून आणण्याच्या निमित्ताने प्रचंड मारामाऱ्या झाल्या. त्यांच्या परिणामी अटक होऊन माणसे तुरुंगात गेली. या अटक झालेल्यांपैकी शामराव उदगीरकर जेलमध्ये वारले. (ही मृत्यूची घटना व दंगलीची घटना अडतीसच्या जरा आधीची म्हणजे सदतीसची. पण -) त्यानंतर आर्यसमाजाने सत्याग्रहाची भूमिका घेतली व त्यांचाही सत्याग्रह सुरू झाला. आर्यसमाजाच्या सत्याग्रहामुळे हिंदूमहासभेनेही सत्याग्रह आरंभला. त्यामुळे अडतीस साली एकाच वेळी, वंदे मातरम्ची विद्यार्थ्यांची चळवळ, स्टेट काँग्रेसचा सत्याग्रह, आर्यसमाजाचा सत्याग्रह आणि हिंदुमहासभेचा सत्याग्रह अशी चार आंदोलने झाली. यातील एका आंदोलनावर इथे चर्चा करावयाची नाही. कारण आर्यसमाज ही संस्थाच फार वेगळी आहे. एका बाजूला वेदांवर कठोर श्रद्धा ठेवणारे आणि जगात वेदांशिवाय दुसरे काहीच नाही असे मानणारी ही मंडळी कर्मठ सनातनी. दुसऱ्या बाजूला वेदात जातिभेद नाहीत म्हणून हे जातिभेद पाळणार नाहीत. वेदात आंतरजातीय विवाहाला, प्रौढ विवाहाला मान्यता

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /२००