पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/197

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

झाली. नेहरू, पटेल आदी जी नेतेमंडळी अधिवेशनाला येत असत त्यांनी मार्गदर्शनासाठी भारतीय संस्थाने आपणात वाटून घेतली हे मी काल सांगितलेच. अखिल भारतीय संस्थानी प्रजा परिषदेचे अध्यक्ष शेख अब्दुल्ला आणि उपाध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ असा जोड बनविण्यात गांधीजींना यश आले. तेव्हा गांधींनी हैदराबादच्या पुढाऱ्यांना सल्ला दिला की, आता राजकीय संघटनेची वेळ आली आहे. तरी तुम्ही हैदराबाद स्टेट काँग्रेस स्थापन करा. या संस्थेला परवानगी मिळणार नाही. तरी कायदेभंग करून, सत्याग्रह करून तुम्हाला ही काँग्रेस स्थापन करावी लागेल. हा धोका घ्यावयाचा की नाही याचा विचार करण्यासाठी मनमाडला एक सभा बोलविण्यात आली. या सभेत असे ठरले की, हैदराबाद स्टेट काँग्रेस स्थापन करावयाची. गोविंदराव नानल यांना तिचे अध्यक्ष करावयाचे. सरकारने तिच्यावर बंदी घातली तर पहिला सत्याग्रह गोविंदराव नानल यांनीच करावयाचा. ही सर्व चर्चा हैदराबादच्या सीमेबाहेर मनमाडला करून लगेच मंडळी सीमेच्या आत आली आणि त्यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेस स्थापन करण्याचा मनोदय जाहीर केला. हैदराबाद शहरातील सुलतान बझारमधील एका जागी काँग्रेसची औपचारिक स्थापना केली. त्याच्या आदल्याच दिवशी हैदराबाद सरकारने एक आदेश काढून संस्थानमध्ये काँग्रेसची स्थापना करायला बंदी घातली होती. स्टेट काँग्रेस स्थापनेची ही मनाई स्थापना होण्याच्या आदल्या दिवशी झाली. हा मनाई हुकूम मोडूनच स्थापना करण्याचा निर्णय झाला व स्थापना घडून कार्यक्रमाला आरंभही झाला. हा हैदराबाद संस्थानात राजकीय आंदोलन जाहीरपणे सुरू करण्याचा पहिला कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातूनच पुढे सर्व घटना क्रमाक्रमाने विकसित झाल्या आहेत.

 ही घटना घडण्याच्या सुमारासच एक तरुण पुण्यातून शिकून नुकताच औरंगाबादला आला होता. याच्याजवळ वक्तृत्व फारसे नव्हते. पण हा अतिशय बुद्धिमान आहे अशी सर्वांची खात्री पटलेली होती. हा माणूस पुण्याहून आला तरी गुजराथी होता. गुजराथी होताच शिवाय सरदार पटेलापर्यंत सर्व गुजराथ्यांशी त्याचे संबंध होते. हा विचाराने अत्यंत पुरोगामी होता. या कार्यकर्त्याला काही वावं देता आला पाहिजे या दृष्टीने औरंगाबादेला विचार सुरू झाला. औरंगाबादच्या तरुणांमध्ये काही सभा घेण्यात आल्या व त्यांना सांगण्यात आले की त्यांनी 'वंदे मातरम्' म्हणावे. वंदे मातरम्चे आंदोलन अशा प्रकारे संस्थानात औरंगाबादेहून सुरू झाले आणि पुढे संस्थानभर पसरले. वंदे-मातरमच्या सभांसाठी औरंगाबादला तरुणांची बौद्धिके घेणारा

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१९९