पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/196

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उलटतात. या खुळ्या घोषणा देणाऱ्यांनी अखंड भारताची लढाई सुरू होण्याआधीच ती राजकारणाच्या पातळीवर हरलेली आहे; आणि या चार प्रांतांवरचा अधिकार सोडून फाळणी येण्याआधीच ती पत्करली आहे. मुसलमानांचे अस्तित्व ही वस्तुस्थिती आहे. तिच्याकडे आंधळेपणाने पाहून चालणार नाही. गांधींनी हे चार प्रांत भारतात राहावेत यासाठी सातत्याने उद्योग केला. त्यात गांधींना अपयश आले यामागे हिंदुस्थान हिंदूंचा ही घोषणा करणारेही साधनीभूत आहेत. अखंड भारताची लढाई लढताना हरलेला नेता याच दृष्टिने गांधींकडे पाहावे लागेल.

 मुसलमान समाजावर ज्याचे वजन आहे असा मुसलमान नेता हाती लागेपर्यंत हैदराबादला राजकीय आंदोलन सुरू करणे महात्मा गांधींना धोक्याचे वाटे. चौतीस साली गांधींचा मार्ग काहीसा मोकळा झाला. सरहद्द प्रांतामध्ये इंग्रजांच्या विरोधी जे आंदोलन सुरू झाले त्यात दोन मुसलमान नेते उदयास आले. एक सरहद्द गांधीअब्दुल गफारखान आणि दुसरे त्यांचे बंधू बादशहाखान. हे दोन नेते असे होते की सत्याण्णव टक्के मुस्लिम लोकसंख्या असणाऱ्या प्रांतात त्यांचे बहुमत होते आणि ते दोघेही महात्माजींचे अनुयायी होते. याप्रमाणे काश्मीरमध्ये अनसार चळवळीतून शेख अब्दुल्ला उदयाला आले. त्यांचे काश्मीरच्या बहुसंख्य मुसलमानांवर प्रचंड वजन होते. ते काश्मीरच्या हिंदू राजाच्या विरूद्ध लढत होते. एक मुसलमान नेता (हिंदू राजाच्या विरोधी लढणाराही) मिळाला की त्याला संस्थानी प्रजा परिषदेचे अध्यक्ष करता येते. आणि त्याच्याच हातून एका मुसलमान राजाच्या विरुद्ध लढायला हिंदूंची संघटना उभी करता येते. तोंडाने तुम्ही निधर्मीपणाच्या कितीही गोष्टी बोला. व्यवहारामध्ये हैदराबादमध्ये काँग्रेस ही हिंदूंची संघटना. तिला मुसलमानांचे नेतृत्व असले तर दहावीस मुसलमान तरी तुमच्याबरोबर राहतील. निधर्मी देखाव्याला हे आवश्यक आहेत. हे सारे लोकशाहीच्या आधुनिक राजकारणाचे स्वरूप आहे. निजामाची निंदाच केली पाहिजे असे म्हणणारे दोन तरी मुसलमान हैदराबादमध्ये हवेतच. त्यांचे मुसलमान समाजावर वजनही असले पाहिजे. छत्तीस-सदतीसपर्यंत असे मुसलमान नेते गांधींना मिळत नव्हते. ते आता मिळाले. गांधीजी स्वतःही संस्थानिक संपविलेच पाहिजे या निर्णयावर आले. त्यामुळे सत्तावीस सालापासून रेंगाळत असणारे संस्थानी प्रजा परिषदेचे प्रकरण आता गतिमान करण्याचा निर्णय गांधींनी घेतला. सदतीस सालापासून या परिषदेची अधिवेशने अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनाप्रमाणे प्रचंड तोलामोलावर घडायला सुरुवात

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१९८