पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/194

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

केले. नंतर निरनिराळ्या ठिकाणी खाजगी शाळा काढण्याचे उद्योग सुरू झाले. ही सरस्वतीभुवन शाळा त्याच वेळी जन्माला आली आहे. याच उद्योगातून उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगा येथे एक छोटीशी प्राथमिक शाळा जन्माला आली आहे. अप्पासाहेब कुलकर्णी व अनंतराव कुळकर्णी हे दोघे मिळून ती शाळा चालवीत असत. या शाळेच्यामुळेच स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, आचार्य ग.धों.देशपांडे यांचे आगमन झाले. अजूनही राजकीय संघटना करायला परवानगी नव्हतीच. धर्मसुधारणेच्या मागण्या कराव्यात, आपल्यावर जी धार्मिक आक्रमणे होतात त्याविरुद्ध तक्रारी कराव्या अशी परवानगी होती. ही धार्मिक आक्रमणेही थोडी होती अशातला भाग नाही. नानाविध आक्रमणांतील एक असे हे मोहरमच्या काळात कुठेही वाद्यच वाजवायचे नाही. मोहरम नसेल तर मशिदीच्या इकडे तिकडे तीनशे पावले पलीकडे वाद्याला परवानगी होती. पण मोहरमच्या काळात संपूर्ण हैदराबाद संस्थानमध्ये कुठेही (घराच्या बाहेर) वाद्य वाजवायचे नाही. यांचा मोहरम केव्हाही येत असतो. तो वैशाखात आला की आमची सर्व लग्नकार्ये दार बंद करून करावयाची. हे असे अनंत धार्मिक अत्याचार. गांधींचे म्हणणे याविरुद्ध दाद मागा. धर्मसुधारणेची आंदोलने करा. म्हणजे हिंदूत कोणत्या उणिवा आहेत त्या सुधारण्याचा उपदेश करण्याच्या निमित्ताने जागृती करा. शैक्षणिक चळवळी चालवा. पण या वेळी राजकीय चळवळी नकोत. धार्मिक चळवळीचे जे उद्योग चालले त्यातून आणखी काही माणसे पुढे आली. त्यातील एक गुलाबचंद नागोरी. यांनी सबंध संस्थानभर मारवाडी समाजाने बुरखा बंद करावा अशी व्याख्याने देण्याचा उद्योग केला. सर्व मारवाडी समाज संस्थानभर संघटित करण्याचा प्रयत्न या एकाच माणसाचा आहे. या उद्योगातून जे नवे नेते पुढे आले त्यातील हरिश्चंद्र हेडा हे पुढे लोकसभेचे सभासदही झाले. दुसरे बिद्रिजीचंद्र चौधरी. हे पुढे स्वामीजींच्या निकटवर्ती मंडळातील एक होते. या सर्वांना मार्गदर्शन जमनालाल बजाज यांचे. आपण सेलूत आहोत. भांगडियांच्या स्मरणातून व्याख्याने देत आहोत. तर भांगडिया आणि जमनालाल बजाज यांच्या संबंधाचे भान आपणाला असू द्या.

 असो. तर हे सर्व उद्योग आहेत. पण राजकीय उद्योग नाही. यासाठी गांधीजींची योजना त्रिस्तरीय (Three Tier) होती. धार्मिक सुधारणा हा पहिला स्तर. बालविवाह नसावे, प्रौढ विवाह असावे, विधवाविवाह असावे. हिंदूंनी बुरखा पाळू नये.

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१९६