पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/177

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्वतंत्र राष्ट्र. त्यामुळे भारत (ब्रिटिश इंडिया) हे परराष्ट्र. परराष्ट्रीय संघटनांच्या शाखांना कोणी आपल्या भूमीवर काम करू देत नाही. परराष्ट्रीय मंडळीला तो अधिकारच नाही. उद्या जर अमेरिकेने सांगितले की तेथील डेमॉक्रेटिक पक्षाच्या चारदोन शाखा हिंदुस्थानात काढू द्या, तर आपण त्या काढू देणार नाही. या भूमिकेनुसारच अखिल भारतीय काँग्रेसची शाखा हैदराबादमध्ये निघूच शकत नाही असे निजामाचे म्हणणे. त्याच न्यायाने अखिल भारतीय मुस्लिम लीगचीही शाखा हैदराबादमध्ये असू शकत नाही. हिंदू असोत की मुसलमान, ही मंडळी परराष्ट्रीय आहेत. याच मुद्द्यामुळे निजाम आणि जीना यांचे नेहमी बिनसत आले. जीनांना हैदराबाद संस्थानात काम करायला निजामाने कधीही परवानगी दिली नाही. स्वतःच्या राष्ट्रापुरती व्यवस्था म्हणून त्याने दोन नव्या मुसलमान संघटना अस्तित्वात आणल्या. त्यातील पहिली दिन दार सिद्दिक अंजुमान ही एकोणीसशे सव्वीसला स्थापन झाली. हिचे काम धर्मप्रचार करणे. या संघटनेला हवे तेवढे पैसे मिळत. सर्वसामान्यपणे त्या वेळच्या दराने वर्षाला एक लाख रुपयांत तिचे काम भागे. धर्मप्रचारासाठी तुम्ही व्याख्यानापलीकडे जाऊ नका आणि बाटवाबाटवी करू नका, अशी प्रकट सूचना असे. धर्मप्रचार याचा अर्थ हिंदू बाटवून मुसलमान करणे हा नव्हे. यासाठी उघड मारामाऱ्या नकोत हे यामागचे धोरण. आतून हवे ते करा.

 दुसरी संघटना इत्तेहादुल मुसलमीन. ही मुसलमानांना संघटित करण्यासाठी एकोणीसशे सत्तावीस साली स्थापन झाली. या संघटनेची उभारणी करण्याचे काम एका निवृत्त अधिकाऱ्याकडे सोपविले. त्याने निरनिराळ्या मशिदीत फिरून शोध घेतला की, उत्तम वक्ते कोण कोठे आहेत, नंतर या वक्त्यांतून बहादुर या वक्त्याची निवड केली. हा ज्वलंत उर्दू भाषेत अतिशय सुंदर बोलत असे. या बहाद्दुरखानाला निजामाने एकोणीसशे एकोणतीसला यारजंग ही पदवी दिली; पायग्याचा नबाब बनविले आणि इत्तेहादुल मुसलमीनचा अध्यक्ष केले. याने वायव्य सरहद्द प्रांतातून गफारखानांचा खाकसार हा स्वयंसेवक या अर्थाचा शब्द उचलला आणि स्वतःचे स्वयंसेवक दल उभारले. खाकसार म्हणजे जनतेचा विनम्र सेवक. अहिंसा हे गफारखानांच्या संघटनेचे व्रत होते ते बहादुर यारजंग याचे नव्हते. क्रमाक्रमाने इत्तेहादुल मुसलमीन संघटना वाढली. तिच्याबरोबरच एका मुद्द्यावर निजाम आणि बहादुर यारजंग यांत मतभेदही वाढू लागले. बहादर यारजंग याचे म्हणणे असे होते : हैदराबाद हा मुसलमानांनी

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१७९