पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/169

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उस्मानिया विद्यापीठ. मी आपल्याला हे सांगत नाही की, निजाम हे मोठे पुरोगामी गृहस्थ होते. मी आपल्याला सांगतो ते हे की ज्याला तुम्ही पुरोगामित्व म्हणता त्याची निजामाला पक्की जाणीव होती आणि हे पुरोगामित्व कसे वापरायचे हे त्याला माहीत होते. पहिल्या दिवसापासूनची निजामाची भूमिका ही आहे की, जर आपणाला स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगायचे असेल; आज नाही उद्या भारतात हैदराबादचे स्वतंत्र राष्ट्र करायचे असेल, तर आपली स्वतःची नोकरशाही (Bureaucracy) पाहिजे. म्हणून निजामाने भारतीय सनदी नोकरांच्या (i.c.s.) तोडीची गुणवत्ता असणारी H.C.S नावाची हैदराबाद सनदी नोकरशाही सुरू केली. यातून बाहेर पडलेले कित्येक अधिकारी भारतीय सनदी नोकरांना आणि मंत्रिमंडळांना भारी ठरलेले आहेत. वाटाघाटीच्या पातळीवर निजामाला या गोष्टीची जाणीव होती की, जागतिक मंचावर ज्या दिवशी तुम्हाला वाटाघाटी कराव्या लागतील त्या दिवशी मुत्सद्देगिरी (Diplomacy) नावाचे प्रकरण अस्तित्वात येणार आहे. त्यासाठी निजामाने ज्या व्यवस्था केल्या त्यातील एक अशी की, त्याने हैदराबादचे निजाम कॉलेज मद्रास विद्यापीठाला जोडले. या विद्यालयात इंग्रजी माध्यमातून शिक्षणाची व्यवस्था केली. संस्थानाबाहेर कोणत्याही कामासाठी जो मुसलमान पाठवायचा तो निजाम कॉलेज आणि मद्रास विद्यापीठ यातून बाहेर पडलेला असे. म्हणून हैदराबादमधून केंब्रिजला, गरज पडली तर ऑक्सफर्डला अथवा जगातील दुसऱ्या कोणत्याही विद्यापीठाला हैदराबादचा विद्यार्थी जाऊ शकत असे. यातून आमचे अनेक मुत्सद्दी बाहेर पडलेले आहेत. यात भारतातील अत्यंत बुद्धिमान मंडळी आहेत.

 नवीन बुद्धिमत्ता शोधून जवळ करणे आणि तिला सतत उठाव देत राहणे यासाठी निजामाने एक नवीन वतनदारी तयार केली. ज्यांच्याशी निजामाच्या राजघराण्याचे सोयर संबंध होऊ शकतात अशांची ही वतनदारी होती. या मंडळीला मराठीत पायठ्याचे नवाब असे म्हणता येईल. यांना 'यारजंग' ही पदवी असे. निजामाने अनेक तरण्याताठ्या पोरांना यारजंग केलेले आहे. जी मंडळी परंपरेने नवाब नाहीतं पण ज्यांची बुद्धिमत्ता अलौकिक आहे अशी ही मंडळी आहेत. निजामाने यातील अनेकांचे संपूर्ण शिक्षण युरोपमध्ये केलेले आहे. युरोपियन मुत्सद्यांसमोर टेबलावर बसून जी बरोबरीच्या नात्याने वाटाघाटी करू शकतील अशी ही बुद्धिवान मंडळी आहेत. यांपैकी दीनयारजंग माईननबाबजंग, अलियावरजंग, होशियारजंग इत्यादी मंडळी ख्यातकीर्त आहेत विश्वातील कुणाही बुद्धिवंताशी टक्कर घेईलं अशी यांची बुद्धी आहे. आपणाला

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन/ १७१