पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/158

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्वीकार करणे शक्य नव्हते, आणि म्हणून त्या वेळचे हैदराबादचे मुख्यमंत्री पी. व्ही. नरसिंहराव यांनी केंद्र सरकारला असे कळविले की, जर गोविंदभाई ताम्रपट घ्यायला येऊ शकले नाहीत तर त्यांनाही - म्हणजे नरसिंहरावांनाही दिल्लीला हजर राहता येणार नाही. या भूमिकेमुळे संपूर्ण भारत सरकारला या मुद्द्याचा फेरविचार करावा लागला. मुद्दा कोणता हे लक्षात घ्या. भारत सरकारचे म्हणणे असे की, हैदराबाद संस्थान भारतात विलीन व्हावे हा झगडा विलीनीकरणाचा होता. आमचे म्हणणे असे की, हा लढा भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनाचा एक भाग आहे; भारतीय स्वातंत्र्याच्या युद्धातील शेवटची लढाई हैदराबादच्या भूमीवर लढली गेली आहे. हैदराबादचे संस्थान संपविल्याशिवाय भारत नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशाची अविभाज्यता सिद्ध झाली नसती. हा प्रादेशिक संलग्नतेचा, अविभाज्यतेचा प्रश्न असल्यामुळे हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाल्याशिवाय भारताला प्रादेशिक संलग्नता मिळत नाही; भारताची घटनाही तयार करता येत नाही; भारताचा एकही प्रश्न सोडविता येत नाही. म्हणून हा लढा केवळ एका संस्थानाच्या विलीनीकरणाचा भाग नसून भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा एक भाग आहे, अविभाज्य भाग आहे, ही मान्यता तुम्ही द्या. ती देणार असाल तर आम्ही ताम्रपट घ्यायला येऊ. नाही तर येणार नाही. शेवटच्या आठवड्यामध्ये भारताच्या त्या वेळच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी हस्तक्षेप करून तशी मान्यता दिली. नंतरच आमची मंडळी ताम्रपट वगैरे घ्यायला गेली. मुद्दा सामान्य वाटेल, पण तो सामान्य नाही. त्याचे महत्त्वाचे कारण हे आहे की, जोपर्यंत हैदराबादचे आंदोलन हे स्वातंत्र्याचा लढा म्हणून मान्यता पावत नाही तोपर्यंत त्या आंदोलनात ज्यांनी शस्त्रे चालविली त्यांना आपण शस्त्रे चालविली हे सांगता येत नाही. स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी जर शस्त्रे चालविली तर कायद्यानुसार स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर त्या शस्त्रांचे गुन्हे माफ होतात. नाही तर अमुक एका ठाण्यावर हल्ला झाला तेव्हा मी बंदूक घेऊन गेलो होतो; मला गोळीबार करावा लागला, त्यात एक माणूस मेला, हे सत्य कोणाला सांगावयाचे असेल तर सांगता येत नाही. इतरांनी हवे ते बोलावे. पण तो स्वतः बोलेल तर ते बोलणे गुन्ह्याचा कबुलीजबाव होईल. हैदराबादच्या इतक्या महत्त्वाच्या लढ्याबद्दल फारसे काही लिहिले गेलेले नाही ते का हे यावरून स्पष्ट व्हावे. कोणी स्वतः लिहीत नाही, कोणी दुसऱ्याला प्रोत्साहन देत नाही त्यामागे हे कारण आहे. कसे सांगावयाचे? अनंतराव भालेरावांनी कसे सांगावयाचे की, उमरी बँकेवर हल्ला

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१६०