पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/157

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भरपूर मोकळीक मिळाली तेव्हापासून त्यांच्याशीही मी चर्चा करीत आलो आहे. श्री. दिगंबरराव बिंदूंशीही तपशिलाने बोलण्याची संधी मला मिळाली. बी. रामकृष्णराव, डॉ. मेलकोटे यांच्याशीही तपशिलाने बोलण्याचा योग आला. हैदराबाद आंदोलनाचे जेवढे महत्त्वाचे ज्येष्ठ नेते आहेत त्या सर्वांशी निरनिराळ्या वेळी निरनिराळ्या प्रश्नांवर मी बोललो आहे. त्यामुळे या विषयासंबंधीची पुष्कळशी इकडची तिकडची आणि बरीवाईट माहिती माझ्याजवळ जमा झालेली आहे. ही सर्व माहिती तीन व्याख्यानांत सामावली जाईल इतकी थोडी नाही. ती पुष्कळच जास्त आहे. पण तीन व्याख्यानांच्या मानाने ती जास्त असली तरी प्रत्यक्षात असावयास हवी त्यापेक्षा पुष्कळच कमी आहे. असलेली माहिती व्याख्यानांत समाविष्ट व्हावी म्हणून काही गोष्टींचा मी संक्षेप करणार आहे. जो सर्वांनाच माहीत असावा अशी अपेक्षा आहे तो भाग, ज्या मुद्दयासंबंधी माझ्याखेरीज इतर माणसेही तपशिलाने बोलू शकतील असा भाग, यांचा विस्तार मी करणार नाही. आंदोलनाची आकडेवारी मी शक्यतो कमी देणार आहे. आंदोलनामागचे ऐतिहासिक धागेदोरे, वरचे राजकारण, पडद्यामागची सत्ये, पिछाडीच्या बाबी अशा गोष्टींच्या तपशिलासंबंधी इथे असलेल्या मंडळींना काही माहिती असण्याचा अथवा त्यांनी मनातल्या मनात काही तर्क जुळविले असण्याचा संभव कमी. त्यामुळे याच बाबीसंबंधी मी जास्त तपशिलाने माहिती देणार आहे.

 या माहितीकडे वळण्यापूर्वी दोन-तीन बाबीसंबंधी आपल्या मनात गैरसमज असतील तर-बहुधा नसावे-पण असतील तर ते आपण दूर करावे. नीट लक्ष द्या. कोल्हापूर संस्थान भारतात विलीन झाले पाहिजे हा विलीनीकरणाचा झगडा आहे. मिरज, सांगली ही संस्थाने भारतात विलीन झाली पाहिजेत हाही विलीनीकरणाचा संघर्ष आहे. पण हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले पाहिजे हा विलीनीकरणाचा झगडा नव्हे ही आमच्या नेत्यांच्या मनातील पक्की भूमिका होती. भारत स्वतंत्र झाला याला एकोणीसशे बहात्तर साली पंचवीस वर्षे झाली. स्वातंत्र्याचा रौप्यमहोत्सव साजरा करण्यात आला. या रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने ताम्रपट आले. ते स्वीकारण्यास गोविंदभाई श्रॉफ यांनी नकार दिला. त्यांनी सांगितले आम्ही दिल्लीला येणारही नाही आणि ताम्रपट घेणारही नाही. ज्या समितीच्या नेतृत्वाखाली हैदराबादचे आंदोलन झाले त्या समितीचे गोविंदभाई श्रॉफ हे सरचिटणीस (General Secretary) होते. आता सरचिटणीसच जर ताम्रपट घ्यायला नकार देत असेल तर उरलेल्या इतरांना ताम्रपटाचा

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१५९