पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/156

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जास्त हैदराबाद शहराशी.

 मी या लढ्यातला नेता वगैरे कोणी नाही ही गोष्ट जितकी स्पष्ट आहे तितकीच मी या लढ्यात सहभागी झालेला एक सैनिक आहे, हीही स्पष्ट आहे. लढ्याच्या निमित्ताने ज्या विद्यार्थ्यांनी शाळांवर बहिष्कार टाकला त्या विद्यार्थ्यांपैकी मी एक आहे. त्यासाठी आयुष्याची जी काही वैयक्तिक किंमत मोजावयाची असते, ती मी मोजलेली आहे. या किमतीविषयी माझी तक्रार तर नाहीच, उलट असली तर थोडीफार शक्यता अशी आहे की, आयुष्यातील तितकेच दिवस उपयोगी पडून सार्थकी लागले असे मी मानतो. आणि त्यामुळेच मी विचारवंत असलो काय आणि नसलो काय, या विषयावर बोलण्याचा माझा हक्कही मी मानतो. आता श्रोत्यांमध्ये विनायकरावांसारखे कोणी समोर असले तर मी त्यांना नम्रतेने आणि सौजन्याने सांगेन की, त्यांनी या विषयावर तपशीलवार सांगावे. कारण ते जेवढे सांगू शकतील तेवढे मी सांगू शकणार नाही. यातला सौजन्याचा नम्रतेचा वगैरे भाग ठीक आहे; पण फक्त विनायकराव असले तरच. उरलेल्या सर्व मंडळीला मी सांगणार की तुम्ही मी सांगेन ते ऐका. कारण तुम्हाला काहीच माहीत नाही व मला बरेच माहीत आहे. दुसरी एक अतिशय महत्त्वाची बाब आहे. ती म्हणजे ही की या आंदोलनामध्ये वरच्या पातळीवर जे नेतृत्व होते, त्या नेतृत्वाच्या अत्यंत निकट राहण्याची संधी मला आयुष्यात लाभलेली आहे. विशेष करून स्वामी रामानंद तीर्थांच्या आयुष्यातील शेवटची दहा वर्षे म्हणजे इ.स. बासष्ट ते बहात्तर असा कालखंड. या कालखंडात स्वामीजींना राजकारणात करण्यासाठी काही काम उरले नव्हते. त्यांना गप्पा मारायला भरपूर वेळ होता आणि मला ऐकून घेण्याची जिज्ञासा होती. त्या वेळी हैदराबादच्या राजकारणाविषयी प्रत्येक बारीकसारीक गोष्टीवर स्वामीजी माझ्याशी विस्ताराने बोलले. स्वामींना बोलण्यासाठी माझ्यापेक्षा जास्त लायक अशी गोविंदभाई श्रॉफसारखी अनेक माणसे होती. पण शिष्यत्वाच्या नात्याने स्वामींजवळ शंका विचारीत बसायला त्यांना वेळ नव्हता. आणि स्वामीजी जे बोलतील ते भोवतीच्या पुराव्यांशी ताडून पाहणे आणि जरूर तर दुरुस्त करून घेणे यालाही कुणाजवळ वेळ नव्हता. गोविंदभाईंशीही माझा संबंध आलेला आहे. सन त्रेपन्न-चौपन्नपर्यंत तो अत्यंत घनिष्ट राहिला आहे. लीग ऑफ सोशियालिस्टसमध्ये (L.S.W.) एक तरुण मुलगा म्हणून मी होतोच. निवडणुकीत उभे राहणाऱ्यांपैकी नसलो तरी सभासद होतो. लीगचे काम संपल्यावर गोविंदभाईंनाही गप्पा मारण्यासाठी

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१५८