पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/155

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे व त्या वेळच्या परिस्थितीची मागणी ही दुसरी बाजू आहे. परिस्थिती तशीच असली तर अनुकूल व्यक्तिमत्त्व नसणारी माणसे त्याही परिस्थितीत जगत असतात. सेलूमध्ये एक भांगडियाच राहात होते अशातला भाग नाही. इतरही असंख्य माणसे होती. पण पाचपंचवीस माणसे सोडली तर इतर मंडळींतून कार्यकर्ते निर्माण झाले नाहीत. परिस्थिती असली की नेतृत्व निर्माण होतेच अशातला भाग नाही. पण जेव्हा नेतृत्व निर्माण होते तेव्हा त्याला पोषक परिस्थिती असतेच. भांगडियांच्या नेतृत्वाला हैदराबाद मुक्तिआंदोलनाची पोषक परिस्थिती होती. या आंदोलनावर इतर कोणी बोलण्याचा संभव कमी. त्यामुळे त्याच्यावर मी बोलणार आहे.

 या विषयावर बोलण्यासाठी मी विचारवंत असण्याची आवश्यकता कमी आहे. मी विचारवंत असलो काय आणि नसलो काय, या मुक्तिआंदोलनावर बोलण्याचा माझा अधिकार स्वयंभू आहे. स्वतःचा असा स्वयंभू अधिकार मानणारे आणखी अनेक आहेत. मी त्यांतला एक. या 'सेलू' गावामध्ये आज जी माणसे आहेत त्यांनी ते आंदोलन जितक्या जवळून पाहिले तितक्या जवळून ते पाहण्याचा योग मला आलेला नाही; कारण मी वयाने लहान होतो. त्यांचा जेवढा सहभाग आंदोलनात आहे तेवढा माझा असणे शक्य नाही. पण वयाने त्या वेळी लहान असलो तरी आंदोलनात सहभागी होणाऱ्यांपैकी मी एक होतो. या सेलू गावात मी जो माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच आलो तो. या आंदोलनाच्या निमित्तानेच आलो होतो. वेळ रात्रीची. पत्रकांचे गठ्ठे या गावातील एका घरी चोरून पोचविण्यासाठी मी आलेला. सप्टेंबर महिन्याचा शेवटचा भाग होता. यापूर्वी मी सेलू गाव पाहिलेले नव्हते. काम दुहेरी. आमच्याकडच्या पत्रकांची बंडले त्या घरी पोहोचवायची व अजून आमच्याकडे न पोचलेल्या पत्रकांची बंडले तेथून न्यायची. ती वसमतला माझ्या गावी नेऊन पोचती करायची, वाटायची. या कामाच्या निमित्ताने मी सेलूला एका रात्री साडेनऊ-दहाच्या सुमारास उतरलो. शांतपणे पत्ता विचारीत विचारीत जायचे त्या घरी गेलो. त्या गृहस्थांना बंडले दिली. त्यांच्याकडची बंडले घेतली. स्टेशनवर आलो. इकडून जाणाऱ्या-येणाऱ्या गाड्या नेहमी उशिरा चालतात त्यादी दिवशी गाडी उशिराच येणार होती. मी स्टेशनवर पावसाच्या झंडीत बारा वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत नुसता बसून राहिलो होतो. नंतर गाडी आली. मी वसमतला गेलो. त्यानंतरही मी त्या काळात आंदोलनाच्या कामासाठी सेलूला काही वेळा आलो होतो. सेलूपेक्षाही माझा संबंध वसमत तालुक्याशी जास्त आलेला आहे; आणि त्याहीपेक्षा

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१५७