पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/154

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






१४.
भांगडिया स्मारक व्याख्यानमाला

व्याख्यान पहिले :

 काही विचारवंतांनी सेलूच्या श्रोत्यांसमोर यावे म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व क्षेत्रातील विचारवंतांच्या विचाराचा लाभ सेलूकरांना होईल आणि भांगडिया यांच्या स्मरणार्थ विचारप्रवर्तनाचे कार्यही सतत चालू ठेवता येईल असा विचार मांडून या व्याख्यानमालेची सुरुवात माझ्यापासून व्हावी असे प्राचार्यांनी कळविले. बोलायचे ठरले ते आपल्या जवळिकीचा एखादा सामाजिक प्रश्न निवडावा हेही पक्के झाले. जवळिकीचे प्रश्न थोडे नाहीत, पण नंतर असे सुचले की जे अनेक विचारवंत येथे येऊन महाराष्ट्राच्या निरनिराळ्या समस्यांविषयी विचार मांडतील त्यांपैकी क्वचितच कोणी हैदराबादच्या मुक्तिसंग्रामाविषयी बोलणे संभवनीय आहे. कारण हे आंदोलन ज्या मंडळींनी चालविले त्यांनी सुद्धा त्याला अभ्यासाचा व लेखनाचा विषय केलेला नाही. तेव्हा मी असे ठरविले आहे की, इतर ज्वलंत समस्यांचा विचार पुढच्या वक्त्यांकडे सोपवून आपण हैदराबादच्या मुक्तिआंदोलनासंबंधी बोलावे. भांगडिया यांचा या आंदोलनाशी जवळचा संबंध राहिलेला आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्वच या आंदोलनामधून उदयास आले आहे. आंदोलन नसते तर भांगडिया हे एखाद्या सर्वसामान्य माणसासारखे जगले असते. त्यांनी थोडासा व्यापार केला असता, काही पैसा मिळवला असता. याशिवाय बाकीच्या भानगडीत ते पडले नसते. राजकीय, सामाजिक अशा सगळ्याच कार्यकर्त्यांच्या बाबतीत आपण ध्यानात घेतले पाहिजे की त्यांचे स्वतःचे व्यक्तिमत्त्व ही एक बाजू

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१५६