पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/153

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नानज ह्या ठिकाणी भारतीय लष्कराने लष्करी हस्तक्षेप करून एक गाव ताब्यात घेतले होते. तिथे हल्ला करण्याची हिंमत रझवीही दाखवू शकत नव्हते. आपल्याजवळ रणगाडे नाहीत, रणगाडाविरोधी तोफा नाहीत, विमाने नाहीत, विमानविरोधी तोफा नाहीत, आपण चहू बाजूंनी घेरलेले आहोत, प्रतिकार आपल्याला शक्य नाही, अशा वेळी मिळतील त्या सवलती पदरात पाडून घेऊन भारतात विलीन होणे शहाणपणाचे ठरले असते. पण ते निजाम आणि रझवींनी पत्करले नाही. ६ सप्टेंबरपासून भारत सरकार हे बजावीत होते की, हैदराबादेत कायदा व सुव्यवस्था संपूर्णपणे कोसळलेली असून तिथे अराजक माजलेले आहे, हे आपण तटस्थपणे पाहू शकत नाही. तातडीने ही परिस्थिती सुधारली नाही तर आपण हस्तक्षेप करू. ह्यानंतर कोणत्याही क्षणी भारतीय फौजा हैदराबादेत घुसतील हे उघड होते. अशा वेळी निदान हैदराबाद संस्थानने प्रमुख पूल उडवून अडथळे उभारावेत. किमान प्रतिकार करावा. फौजांनी एखाद्या ठिकाणी एखादा दिवस तरी लढावे. हेही घडले नाही आणि शक्तीच नसेल तर तातडीने तडजोड करावी, हेही इथे घडले नाही. १३ सप्टेंबर १९४८ ला सकाळी पोलिस अॅक्शन सुरू झाली. त्याच दिवशी सायंकाळपर्यंत औरंगाबाद हे सुभ्याचे ठिकाण पडले. १६ ला संध्याकाळपर्यंत लढाई संपलेली होती. भारतीय फौजा हैदराबादशेजारी आलेल्या होत्या. १७ ला अधिकृतरीत्या हैदराबादेत शरणागती पत्करली व भारताच्या प्रादेशिक अखंडतेच्या युद्धाचा विजयी शेवट झाला.

 हैदराबाद मुक्ति-संग्रामाची ही एक संक्षिप्त व ढोबळ रूपरेखा आहे. हिच्यातील सर्वच बाजूंचा अतिशय तपशिलाने आणि बारकाव्यानिशी आढावा घेतला जाण्याची जरूर आहे. कारण ह्या भूमीवर भारताच्या प्रादेशिक अखंडतेचा निर्णय लागणार होता. जनतेचे लढवय्ये व संस्थान विलीनीकरणाचा प्रश्न नसून राष्ट्राच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे, हे समजूनच लढत होते. पशुतुल्य क्रौर्य, अनन्वित अत्याचार पिसाट धर्मवेड एकीकडे आणि आत्मबलिदानाच्या, पराक्रम-शौर्याच्या सहस्त्र घटना दुसरीकडे असा रोमहर्षक कालखंड आहे. त्यातील काही कहाण्या अशोक परळीकरांनी नोंदविल्या आहेत. मी प्रस्तावनेच्या रूपाने ह्या कहाण्यांची चौकट सांगत आहे. हा काल आपण कर्तव्यभावनेने जगलो ह्याचा अभिमान त्या लढ्यातील प्रत्येक कार्यकर्त्याला जीवनाच्या शेवटापर्यंत वाटत राहणार आहे. एवढेच समाधान लढ्यातील कार्यकर्त्यांना मिळत असते आणि इथेच कर्तव्य-भावनेचा शेवट झाला पाहिजे.

***

(लेखन काळ इ. स. १९७५)

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१५५