पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/152

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पण काय करावे ह्याविषयी निर्णायक भूमिका घेण्यास ते तयार नव्हते. जास्तीत जास्त सवलती देणारी शेवटीच माऊंटबॅटन योजना सुद्धा निजामाने फेटाळली आणि त्यानंतर माऊन्टबॅटन इंग्लंडला चालते झाले. हा प्रश्न लष्करी हस्तक्षेपाशिवाय सुटणार नाही हे नेहरूंनाही आता दिसू लागले आणि लष्करी हस्तक्षेप म्हटल्याबरोबर सर्व सूत्रे पटेलांच्या हाती आली.

 परिस्थिती कोणते वळण घेते आहे ह्याचा अंदाज हैदराबादेतील चतुर मुस्लिमांना येतच होता. जास्तीत जास्त सवलती मिळवून हैदरबादने भारतात विलीन व्हावे असे ह्या चतुर मंडळींचे आता मत झाले होते. अलियावर जंग, ह्यांच्या प्रेरणेने मेहेंदी नवाज जंग, मंजूरयार जंग व इतर मंडळींनी दिलेल्या सवलती स्वीकारून हैदराबादने भारतात विलीन व्हावे असे जाहीर प्रतिपादन करणारे पत्रक काढले होते. ह्या भूमिकेला युवराज मौजम जहा आणि त्याची पत्नी ह्यांचाही पाठिंबा होता. ही मोठी देशभक्त मंडळी नव्हेत. अतिरेकी भूमिका घेऊन सर्वस्व गमावण्याचा 'जुव्वा' आपण खेळू नये. आपल्या सर्व सुखसोयी जास्तीत जास्त सांभाळून न पेलणारा डाव खेळणे टाळावे इतकेच ह्यांचे म्हणणे होते. पण असे सल्ले स्वीकारणे आता निजामाला सोपे नव्हते. कारण धर्मवेड्यांचे नेतृत्व आता पूर्णपणे रझवींच्या हाती गेले होते, आणि कासिम रझवी स्वतःला मुजाहिदे आझम म्हणजे श्रेष्ठ हुतात्मा व धर्मात्मा असे म्हणवून घेत होते. ते हैदराबादेत धर्मयुद्धाचा महान इतिहास लिहून घेऊ इच्छीत होते. पण स्वतःला धर्मवीर मानणारा हा माणूस आत्महत्या करण्याचे धैर्य सुद्धा दाखवू शकला नाही आणि सरदार पटेलांनी त्याला शत्रुपक्षाचा बंडखोर नेता म्हणून फासावर चढवले नाही. पटेलांच्या मते रझवीच्या लायकीला सामान्य डाकू म्हणून पाच-सात वर्षाची शिक्षा पुरेशी आहे. त्याने पळून जाऊन पाकिस्तानात मरावे हेच भवितव्य त्याला इष्ट आहे. त्याच्या जीवनात कोणतेही दिव्य उज्वल स्थान सरदार शिल्लक ठेवू इच्छीत नव्हते. हा महान धर्मवीर कैद भोगून सुटला. नंतर पाकिस्तानात गेला व तेथे एक किरकोळ प्रसिद्धखात्यातील अधिकाऱ्याची नोकरी करीत करीत वारला.

 आज हैदराबादच्या पोलिस अॅक्शनकडे पाहिले म्हणजे निजामाने हा मूर्खपणा का केला हे समजतच नाही. पाकिस्तान मदतीला येऊ शकणार नाही हे जुनागढ प्रकरणी सिद्ध झाले होते. हैदराबाद भोवताली क्रमाने लष्करी वेढा आवळला जात होता. ही गोष्ट जूनपासून उघड होती. सरहद्दीवर लष्कर उभेच होते. २४ जुलै रोजी

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१५४