पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/150

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ह्या पुराव्यावरच पुढे कासिम रझवींना सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली. एक आंतरराष्ट्रीय गुंड सिडने कॉटन ह्याने हैदराबादला चोरटी शस्त्रे पुरविण्याचा उद्योग सुरू केला होता. त्याला गोव्यात उतरण्याची परवानगी सालाझार सरकारने दिलेली होती. सिडने कॉटन भारतात फारशी शस्त्रे आणू शकला नाही, पण वातावरणनिर्मितीला त्याचा उपयोग झालाच. ह्या सर्व कारणांमुळेच क्रमाने जैसे थे करारानंतर हैदराबाद येथील अत्याचार वाढतच गेले. पैकी सर्वांत जास्त अत्याचार रझाकारांनी बीदर जिल्ह्यात केले.

 खरे म्हणजे निजामाला शांततेचा मार्ग अधिक उपयोगी ठरू शकला असता. हैदराबादेतील मुसलमानांना तर हे स्वतंत्र राष्ट्र हवेच होते; पण त्याखेरीज सर्व प्रमुख वतनदार आणि जहागीरदारांना आपल्या इस्टेटीच्या संरक्षणार्थ हैदराबाद हवेच होते, संस्थान विलीन झाल्यानंतर ह्या जहागिरीही गेल्या - संपल्या, त्या तशा संपणार ह्याची वतनदारांना जाणीव होती. बी.एस.व्यंकटराव, श्यामसुंदर ह्यांच्यासारखे काही दलित नेते रझाकारांच्या बरोबर होतेच. ह्यामुळे सर्व दलित समाज आपल्याबरोबर आहे, असे सोंग आणता येणे शक्य होते. मुस्लिम वर्चस्व होतेच. काही भीती, काही सवलती ह्यांच्या जोरावर हिंदूंचा एक मोठा विभाग निजाम आपल्याबरोबर ठेवू शकत होता. विदर्भातील काही देशद्रोही नेत्यांना विदर्भही हैदराबादेत विलीन व्हावा असे वाटत होते, तसे प्रयत्न त्यांनी सुरू केले होते. ह्या गटात कोण होते ह्याचा अंदाज प्रकाशित झालेल्या सरदार पटेलांच्या पत्रव्यवहाराच्या हैदराबाद खंडावरून येऊ शकेलच. स्वतःला काँग्रेसमन म्हणवणारे जी. रामाचारीसारखे नेते निजामाला वश होतेच. स्वतः कन्हैय्यालाल मुन्शींच्याजवळ बोटचेपेपणा भरपूर होता. ते हैदराबादेत भारत सरकारचे प्रतिनिधी होते. इतरत्र मी ह्या विषयावर विस्ताराने लिहिलेले आहे तेव्हा निजामाला हिंदू सामील नव्हतेच असे समजण्याचे कारण नाही. पण ह्या पिसाट नेतृत्वाला ह्याचा फायदा घेता आला नाही; आणि तो घेता येऊ नये ह्याविषयी पंडित नेहरू दक्ष होते. सार्वमतापूर्वी शांतता प्रस्थापन आणि रझाकार संघटनेवर बंदी, ह्या संघटनेजवळची शस्त्रे काढून घेणे, ह्या काही अटी होत्या. जवळ जवळ सार्वमताची कल्पना स्वीकारणे त्यांनी निझामाला अशक्यच करून टाकले होते.

 कासिम रझवी ह्यांच्याजवळ व त्यांच्या प्रभावामुळे सर्व इत्तेहादुल मुसलमीनजवळ अहंता, क्रौर्य व भित्रेपणा, मूर्खपणा ह्यांचे चमत्कारिक मिश्रण झालेले होते. आपण

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१५२