पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/145

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जाणार हे उघडच होते. अशा वेळी अहिंसक आंदोलन शक्य नव्हते. काँग्रेसने निःशस्त्र आणि सशस्त्र अशा आंदोलनांचा दुहेरी विचार करून ठेवलेला होता. हा विचार करूनच जनतेला आंदोलनाची हाक देणारा प्रस्ताव अधिवेशनात मांडला.

 सर्वच कार्यकर्त्यांना एका गोष्टीची जाणीव होती की, हा असामान्य लढा आहे. ह्या लढ्यात एक तर निजामाचे संस्थान समाप्त होईल अगर भारतीय राष्ट्राच्या ठिकऱ्या उडवल्या जातील; म्हणून तडजोडीला येथे वाव नव्हता. वाटाघाटीसाठी आंदोलन मागे घेण्याची शक्यता नाही. काही दिवस थांबून पुन्हा नव्याने आंदोलन सुरू करावे, हे येथे घडणार नाही. ह्या अधिवेशनातच बाबासाहेब परांजपे ह्यांनी तरुणांना बोलताना असे सांगितले, 'मित्रहो, महामृत्युंजयाचा जप रोज करीत राहा आणि आजपासून आपले शरीर साडेतीन हाताचे नसून तीनच हातांचे उरले आहे, ह्याची खूणगाठ बांधून ठेवा!' ह्याही सभेला मी उपस्थित होतो. तसा अधिकृतरीत्या लढा ७ ऑगस्ट १९४७ ला स्वामी रामानंद तीर्थ ह्यांच्या सत्याग्रहापासून सुरू होतो, पण त्यापूर्वीच अनेक कार्यकर्ते भूमिगत झाले असून सशस्त्र आंदोलन चालवण्यासाठी एक कृतिसमिती नेमलेली होती. ह्या कृतिसमितीचे नेते भूमिगत होते व ते संस्थानाबाहेरून मार्गदर्शन करीत होते. काँग्रेसने अधिकृतपणे सशस्त्र आंदोलनाची तयारी केली, त्याचे मार्गदर्शन केले आणि आंदोलन संपल्यानंतर सुद्धा अधिकृतपणे ह्या आंदोलनाचे दायित्व जाहीरपणे स्वीकारले. मी ह्या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, स्टेट काँग्रेस सशस्त्र आंदोलनाचे नेतृत्व करीत आहे, ही गोष्ट स्पष्टपणे महात्मा गांधींना काँग्रेसच्या अध्यक्षांना म्हणजे स्वामीजींनी सांगितलेली होती, आणि गांधींनी भेकडपणे पळून जाण्यापेक्षा शक्य असेल त्या मार्गाने अत्याचाराचा प्रतिकार करण्याचा जनतेचा हक्क मान्य केलेला होता. ते म्हणत, हा लढा बलिदान करू इच्छिणाऱ्या श्रद्धावान अहिंसकांनी आपल्या बलिदानाने रंगविला असता तर मला आवडले असते; पण अशा बलिदानाची तयारी नसणाऱ्या मंडळींनी भेकडपणे पळून जाणे अगर लाचारी पत्करणे ह्यापेक्षा मी हे प्रतिकार करणारे लोक श्रेष्ठतर मानतो.

 हैदराबादच्या जनता आंदोलनात एक भाग सत्याग्रहाचा आहे. फार मोठ्या प्रमाणात जनतेने सत्याग्रहाला प्रतिसाद दिला. लोकसंख्येच्या प्रमाणात विचार केला तर भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात लोकसंख्येशी सत्याग्रहाचे प्रमाण इतके कधीच नव्हते. एक भाग जंगल सत्याग्रहाचा आहे. त्याचेही स्वरूप प्रचंड होते. तिसरा भाग सशस्त्र

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१४७