पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/144

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खिलाफतच्या आंदोलनात काँग्रेसच्या राजकारणाकडे काही मुसलमान खेचले गेले होते. ह्याच प्रभावातून तिरमिजींचा उदय होतो. गांधींचे आंदोलन मुस्लिम समाजाच्या आणि मुस्लिम धर्माच्या हिताचे नाही, हे चित्र जसजसे उघड झाले तसतसा एकेक मुस्लिम नेता गांधींना सोडून जीनांकडे गेला. पण तिरमिजी क्रमाने काँग्रेसच्या राजकारणात रमले. १९३८ च्या सत्याग्रहात ते होतेच. दीर्घकाळापर्यंत ते हैदराबाद शहर काँग्रेसचे अध्यक्ष होते. जातीयवादाच्या विरुद्ध लोकशाही स्वातंत्र्याचा आवाज वर्षानुवर्षे निजामाच्या नगरीत घुमवीत ठेवणारा हा एक लोकविलक्षण नेता होता. ज्याच्यासाठी आत्मसमर्पण ही सहज क्रीडा होती. हुतात्मा पानसरे मारले गेल्याची बातमी जेव्हा हैदराबादेत आली त्यानंतर भरलेल्या कंदास्वामीबाग येथील प्रचंड जाहीर सभेत तिरमिजींनी हैदराबादच्या एकूण राजकारणावर आग ओकणारे भाषण केले, त्याचा, मी श्रोता होतो. बोलताना भावनेच्या आवेगात तिरमिजी म्हणाले, “पानसरे भाग्यवान ठरले. कारण त्यांना एका विशिष्ट दिवशी हुतात्मा होता आले. मी गेले एक तप रोजच मरणाच्या सावलीखाली आहे. हे माझे व्याख्यान आपण माझ्याही शोकसभेचे व्याख्यान समजावे; पण ह्या बलिराजाचा शेवट बलिदान घेणाऱ्या शक्तीचा संपूर्ण अस्त होण्यात होणार आहे, हे अत्याचारी राजवटीने लक्षात ठेवावे!" आणि शेवटी उर्दू शेर म्हटला त्याचा अर्थ असा होता, कत्तल करणाऱ्या समशेरीत जोर किती आहे ह्याचीच आता परीक्षा सुरू झाली आहे. शोइब उल्लाखानच्या बरोबर तिरमिजीला अभिवादन केल्याशिवाय मला मार्ग नाही.

 पारतंत्र्यातील संस्थानी काँग्रेसचे शेवटचे अधिवेशन जूनच्या मध्यावर इ. स. १९४७ साली झाले. ह्या वेळेपर्यंत काही बाबी स्पष्ट झाल्या होत्या. निजामाची इच्छा भारतात विलीन न होता स्वतंत्र राष्ट्र होण्याची आहे, हे स्पष्ट होत होते. ही घटना घडू दिली जाणार नाही, ह्याविरुद्ध प्रचंड आंदोलन काँग्रेस उभारील, हेही स्पष्ट झाले होते. ह्या अधिवेशनातच बीदर जिल्ह्यातील त्या वेळचे एक तरुण जहाल कार्यकर्ते मुरलीधर कामतीकर ह्यांनी निजामाला जाहीरपणे अशी धमकी दिली की, “हे निजाम, जनतेशी टक्कर घेण्याच्या भागनगडीत तू पडू नकोस. आम्ही तुझे डोके फोडू." तेव्हा आंदोलन कसे चालणार हे उघडच होते. हैदरावाद संस्थानात कायद्याचे राज्य नाममात्रच होते. रझाकार कोणताही कायदा पाळण्यास तयार नव्हते. त्यांचे अत्याचार राजरोस चालू असत. ह्या आंदोलनाच्या विरुद्ध ही अत्याचारी शक्ती मोठ्या प्रमाणात वापरली

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१४६