पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/142

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 हैदराबादच्या राजकारणात काही चमत्कारिक बाबी आहेत. जनतेचे सत्याग्रही आंदोलन जेव्हा इ. स. १९३८ ला सुरू झाले तेव्हा त्याचे स्वरूप मोठे गुंतागुंतीचे होते. ह्या आंदोलनाचा एक भाग विद्यार्थ्यांच्या 'वंदेमातरम्' सत्याग्रहातून येतो. निजामाने 'वंदेमातरम्' म्हणण्यास बंदी घातली होती, ती अनेक विद्यार्थ्यांनी तोडली व सत्याग्रह केला. हैदराबाद येथील बहुतेक कम्युनिस्ट नेते आपला 'वंदेमातरम्' म्हणण्याचा हक्क बजावताना जन्माला आले आहेत. कम्युनिस्ट नसणारे आणि असणारे मार्क्सवादी हे हैदराबादेतील राष्ट्रवादी चळवळीचे प्रमुख नेते होते. इतरत्र भारतात असे घडले नाही. हैदराबाद आंदोलनातील दुसरी महत्त्वाची घटना वेदाचे अभिमानी आणि व्यवहारात कर्मठ असलेल्या आर्यसमाजाची चळवळ ही आहे. हे आर्यसमाजी लोक तत्त्वज्ञान काहीही सांगोत, प्रत्यक्ष व्यवहारात प्रखर राष्ट्रवादी, धर्मसुधारक व समाजसुधारक, कडवे मुस्लिमविरोधक आणि नेहमीच सशस्त्र क्रांतीच्या भूमिकेला अनुकूल मनोवृत्ती असणारे असे होते. प्रथम आर्यसमाजाची चळवळ स्वतंत्र सुरू झाली; पण नंतरच्या काळात हैदराबाद संस्थानातील बहुतेक आर्यसमाजी मंडळी संस्थानी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली म्हणजेच गांधीजींच्या नेतृत्वाखाली होती. ह्या मंडळींची अधिक नावे नोंदविण्याचे कारण नाही. पुढील कथांमधून नोंद असणारे विनायकरावजी विद्यालंकार हे आर्यसमाजाचे प्रमुख नेते होते. ते पुढे प्रांतिक सरकारात अर्थमंत्री झाले. पंडित नरेंद्रजी हे ह्यापैकीच. उमरी बँकेच्या योजनेत ज्या माणसाचा अत्यंत महत्त्वाचा भाग होता तो धनजी पुरोहित आर्यसमाजीच होता. पूर्ण कम्युनिस्ट, अर्ध कम्युनिस्ट कार्यकर्त्यांना हैदराबादेत आर्यसमाजाबरोबर राहण्यात किंवा आर्यसमाजाला ह्या मंडळीबरोबर राहण्यात व दोघांनाही गांधीजींचे नेतृत्व स्वीकारण्यात हैदराबादला अडचण आली नाही.

 हैदराबाद संस्थानाचे स्वरूप लक्षात घेता येथील जनतेच्या आंदोलनांना हिंदुत्ववादी रंग चढणे अगदी स्वाभाविक होते. नेते काहीही बोलत, जनता मुस्लिम अत्याचारांना वैतागलेली होती, त्यामुळे हे क्षेत्र हिंदुत्ववाद्यांना अतिशय सोयीचे होते. जिथे बहुसंख्याक कार्यकर्त्यांचा अहिंसेवर विश्वास नसतो आणि जिथे मुसलमानांच्या धार्मिक व राजकीय वर्चस्वाविरुद्ध प्राणपणाने लढायचे असते तिथे निदान हिंदुमहासभा बलवान झालेली दिसावी अशी अपेक्षा असते. हैदराबाद संस्थानात इ. स. १९३८ साली हिंदुमहासभेने निःशस्त्र प्रतिकार आंदोलनाला आरंभ केला होता. पण हिंदुमहासभेला ह्या संस्थानात कधीही फारसा पाठिंबा मिळाला नाही. असे दिसते की, हिंदू समाज इंग्रजांच्या विरुद्ध

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१४४