पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/141

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हैदराबाद पोलिस ॲक्शन झाले त्या वेळी रझाकारांची संख्या सुमारे दोन लक्ष होती. ही सशस्त्र संघटना होती. हैदराबादच्या फौजा बेचाळीस हजाराच्या होत्या. पोलिस ह्याहून निराळे होते. सारे प्रशासन मुसलमानांनी भरलेले होते. सोळा लक्ष लोकसंख्या असणाऱ्या जमातीचा हा हैदराबादच्या राजकारणातील वाटा म्हणजे जवळपास शेकडा शंभर लोकांचा वाटा होता. जे मुस्लिम सदस्य स्टेट काँग्रेसबरोबर होते त्यांची एकूण संख्या एका हाताच्या कांड्यावर मोजता येण्याजोगी इतकी अल्प होती.

 आपण निजामाची माहिती घेत आलो आहोत. त्याशेजारी हैदराबादच्या जनता आंदोलनाचीही माहिती घेतली पाहिजे. हैदराबाद संस्थानात राजकीय जागृतीला आरंभ खऱ्या अर्थाने इ.स. १९२५ नंतर होतो. पण त्याला एका संघटनेचे स्वरूप आलेले नव्हते. संघटितपणे जनतेचे आंदोलन हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या रूपाने उदयाला आले. ह्या संस्थेची प्रेरक व मार्गदर्शक व्यक्ती प्रत्यक्ष महात्मा गांधी ही होती. वीरगाथा लिहिणाऱ्या लेखकांना गांधी-नेहरूंची अवहेलना करणे सोपे असते. इतिहास नोंदविणाऱ्यांना असे करता येत नाही. भारतातील सर्व संस्थाने प्रतिगामी असून त्यांना स्वतंत्र भारतात जागा नाही. सर्व संस्थाने संपलीच पाहिजेत, ह्या निर्णयावर जवाहरलाल नेहरू इ.स. १९२५ पूर्वी येऊन पोचले होते. पण गांधीजींना काँग्रेसने संस्थानी राजकारणात लक्ष घालावे हे पसंत नव्हते. १९३५ च्या कायद्याच्या नंतर ह्या कायद्यातील फेडरल भाग अमलात आणण्याचा प्रश्न जेव्हा उभा राहिला तेव्हा गांधींना असे दिसू लागले की, संस्थानिकांना स्वातंत्र्याची आस्था नाही. त्यांच्यावर दाब असणाऱ्या जनतेच्या संघटना संस्थानातून अस्तित्वात आणल्या पाहिजेत. ह्यानंतर एकेका नेत्याने आपले कार्यक्षेत्र निवडले. बिहारच्या संस्थानी राजकारणाला राजेंद्रप्रसाद साक्षात मार्गदर्शन करीत. हैदराबादचे काँग्रेसचे राजकारण प्रत्यक्ष गांधीजींशी संबंध ठेवून केले जात असे. इ.स.१९४५ पर्यंत प्रत्येक बाब स्वतः गांधीजी पाहात. नंतर साक्षात मार्गदर्शन पंडित नेहरूंचे असे. हैदराबाद स्टेट काँग्रेसला सरदार पटेलांचे मार्गदर्शन प्रत्यक्षपणे घेण्याची वेळ पोलिस ॲक्शननंतर आली. हैदराबादच्या पुढच्या राजकारणावर ह्या घटनेचे गंभीर परिणाम झाले. सरदार पटेलही काँग्रेसचेच नेते होते. सर्वांच्या मनात त्यांच्याविषयी आदर असे. त्यांच्याशीही चर्चा होत; पण सरदारांनी नेहमीच आज्ञा घेण्यासाठी प्रथम गांधींकडे आणि नंतर नेहरूंच्याकडे वोट दाखविले. त्यांच्या स्वतःच्या आज्ञा जिथून सुरू झाल्या तिथून स्टेट काँग्रेसचा इतिहास सुरू होतो.

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१४३