पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/140

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

राहणार होते, कायदे-आझम जीना ह्यांचे. निजामाला आपल्या संस्थानात स्वतःच्या तंत्राने चालणारी मुस्लिम जातीयवाद्यांची संघटना हवी होती. निजामाच्या प्रेरणेने हैदराबाद संस्थानापुढे प्रसिद्धी पावलेल्या इत्तेहादुल मुसलमीन ह्या संघटनेची स्थापना झाली. ह्या संघटनेचे एक स्वयंसेवक दल होते. आरंभी ह्या दलाला खाकसार म्हणत. पुढे हेच दल रझाकार या नावाने प्रसिद्ध झाले. ह्या संघटनेचे नेते बहादूर यार जंग होते. उर्दू भाषेत अलौकिक वक्तृत्व करणारे असे ते नवाबी नेते होते. धर्मवेड त्यांच्यातही भरपूर होते. अगदी आरंभीच्या काळातच त्याने असे जाहीर केले की, मुसलमान हे ह्या देशाचे विजेते आहेत. ते तैमूर आणि बाबरचे वंशज आहेत. हैदराबाद ही इस्लामची विजित भूमी म्हणजे दार उस सालम आहे, आणि म्हणूनच जंगली लोकांना इस्लामच्या सुसंकृत धर्माची दीक्षा देण्याचा त्यांना हक्क आहे. त्याही जुन्या काळात आमचे नेते कै. गोपाळशास्त्री देव ह्यांनी केवळ वैयक्तिक बेछूटपणाच्या जोरावर बहादूर यार जंग ह्यांना तोंडावर आपण त्याचे डोके फोडू अशी धमकी दिली होती. त्याही नंतर गोपाळशास्त्री देव जिवंत राहिले हेच आश्चर्य आहे.

 राजकीय संघटनांचा एक नियम असतो. संघटना बलवान होतात, त्यांना निष्ठावंत अनुयायी लाभतात, त्यामुळे नेते वलवान होतात. जनतेचा पाठिंबा असणारे हे बलवान नेते फार काळ दुसऱ्याच्या तालावर नाचत असतात. ते सत्तेवर आपले प्रभुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. हेच बहादूर यार जंगने केले. त्यामुळे त्याचा आकस्मिक मृत्यू झाला. बहादूर यार जंग ह्यांचा खून झाला हे उघड सत्य होते. फक्त ह्या खुनाच्या मागे निझामाची मूकसंमती होती की त्याची साक्षात प्रेरणा होती एवढाच वादविषय आहे. नंतर ह्या संघटनेला निजामाने दुबळे नेते पुरविले. असाच एक दुबळा भरमसाट बोलणारा धर्मवेडा व अतिरेकी नेता कासिम रझवी होता. कासिम रझवीची बुद्धी बेताची, त्याची लायकीही बेताची म्हणून तो आपल्या तंत्राने चालेल अशी निजामची समजूत होती. पण आपले नेतृत्व बलवान झाल्यानंतर कासिम रझवी हाही निजामाला डोईजड दिसू लागला. शेवटच्या काही महिन्यांत हैदराबाद संस्थानावर प्रत्यक्ष ताबा कासिम रझवी ह्याचा होता; त्याला आवरणे निजामाच्या आटोक्यात राहिले नव्हते; असे सामान्यांना वाटू लागले. रझवीला आटोक्यात आणण्याचा एकच मार्ग होता. तो म्हणजे भारताचे साहाय्य घेणे, असेही काही मानू लागले. हा मार्ग स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याच्या पिसेपणाने भारलेल्या निजामाला पटणारा नव्हता.

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१४२