पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/139

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

देण्याचाच निजामाचा प्रयत्न होता. हैदराबाद हे स्वतंत्र राष्ट्र, ह्या राष्ट्राचा सुलतान स्वतः निजाम आणि हे राष्ट्र इस्लामी राष्ट्रवाद अंगीकारणारे, असे निजामाचे स्वप्न होते. ८५ टक्के हिंदू अत्याचाराने पीडलेले आणि लाचार होते. १० टक्के मुसलमानांना हे राष्ट्र आपले आहे म्हणून ते आपण टिकवले पाहिजे असे वाटत होते. हिंदू समाज नेहमी विस्कळीत असतो. अतिजहालांच्या शेजारी निमजहाल, त्यांच्या शेजारी मवाळ, त्या शेजारी राजनिष्ठ अतिमवाळ असे अनेक प्रवाह हिंदू समाजात असतात. मागासलेल्या त्या लाचार जगात मवाळ अतिमवाळांना हाती धरून निजाम स्वातंत्र्य आंदोलनाला शह देऊ शकला असता. अशाच प्रकारचे उद्योग त्याचे पूर्वज करीत आले. पण उस्मान अलीखानच्या डोक्यात इस्लामी राष्ट्रवादाचे भूत चढलेले असल्यामुळे सर्व मवाळांनाही जहालांच्या बरोबर जाणे भाग असे. निजामचे हे दूरदर्शित्व सर्वांच्या फायद्याचे ठरलेले आहे.

 गादीवर आल्यापासून निजाम स्वतंत्र होण्यासाठी धडपडत होता. त्याने ब्रिटिश गव्हर्नर जनरलला अशी सूचना दिली होती की, ज्याप्रमाणे त्यांचा रेसिडेंट हैदराबादला राहतो त्याचप्रमाणे हैदराबादचा एखादा वकील दिल्लीत ठेवायला काय हरकत आहे? एकदा निजामाने असाही मुद्दा मांडला होता की, त्याने स्वतःला हिज मॅजेस्टी म्हणवून घ्यायला काय हरकत आहे? संरक्षण आणि विदेशनीती सोडल्यास आपण अंतर्गत कारभारात सर्वथैव स्वतंत्र आहोत असेही त्याचे म्हणणे असे. जुन्या काळी निजामच्या ताब्यात असणारे वऱ्हाडचे चार जिल्हे मध्यप्रदेशला जोडण्यात आले होते. ते आपल्याला परत मिळावेत असा शेवटपर्यंत निजामाचा आग्रह होता. मीर उस्मान अलीखान, ह्यांच्या ह्या सर्व हालचाली १९३५ पूर्वीच्या आहेत. भारतीय स्वातंत्र्याची संधी साधून निजाम स्वतंत्र होऊ इच्छीत होता हे अर्धसत्य आहे. नेहमीचं निजामला स्वतंत्र राष्ट्राचा अधिपती होण्याची इच्छा राहिली; हाही ह्या सत्याचा भाग आहे. ब्रिटिश इंडियात क्रमाने मुस्लिम लीग बलवान होताना दिसत होती. हैदराबाद संस्थानात मुस्लिम लीगने कार्य करावे असे निजामाला अजीबात वाटत नव्हते. जीनांनाही संस्थानिक प्रदेशात काम करण्याची इच्छा नव्हती. अर्थातच निजाम आणि जीना यांची कारणे भिन्न होती. निजाम स्वतःला राष्ट्र समजत असल्यामुळे ब्रिटिश इंडियातील संस्था ह्या त्याच्यामते परराष्ट्रातील संस्था होत्या. परराष्ट्रीय संस्थांनी आपल्या राष्ट्रात काम केल्यामुळे आपल्या राष्ट्रवादाची हानी होते. असें निजामाचे मत होते. शिवाय लीगवर नेतृत्व

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन/१४१