पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/138

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अलीखानचे व्यक्तित्व अतिशय गुंतागुंतीचे होते. अत्यंत धनलोभी आणि चिक्कू म्हणून प्रसिद्ध असणारा व साधी राहणी जतन करणारा हा जगातला अति धनाढ्य माणूस होता. पण त्याबरोबरच नवीन कापड गिरण्या काढणारा, नवे विद्यापीठ स्थापणारा, धरणे बांधणारा, साखर कारखाने काढणारा, कोळशाच्या खाणी आणि कागद उद्योग सुरू करणारा, हैदराबादला भव्य आणि सुंदर रूप देणारा असाही हा राजा होता. ह्याच निजामाने हैदराबादचे प्रशासन आधुनिक करण्याचा अहर्निश खटाटोप केला. अत्यंत चतुरपणे व धीमेपणे आपल्या इच्छिताकडे वाटचाल करणारा असाही हा अधिपती होता. आपण तुर्क आहोत असे तर निजामचे म्हणणे होतेच, पण आपण स्वतंत्र आहोतं असाही त्याचा दावा होता.

 एखाद्या राष्ट्राप्रमाणे निजामाने हैदराबादची व्यवस्था केली होती. संस्थानला स्वतःची वाहतूक व्यवस्था होती, स्वतःचे रेल्वे व पोस्ट होते, आपली चलन-वलन व्यवस्था होती, आपल्या बँका होत्या, स्वतःची सिव्हिल सर्व्हिस तर होतीच, पण स्वतःचे लष्करही होते. व्यवहारतः आपण स्वतंत्र आहोत ही भूमिका निजामने वेळोवेळी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता. हैदराबाद हे स्वतंत्र राष्ट्र व्हायचे असेल तर त्या राष्ट्राचे समर्थकही असायला पाहिजेत, म्हणून निजामाने हैदराबादला इस्लामी राष्ट्राचे रूप देण्याचा अतिशय सर्वंकष असा प्रयत्न केलेला होता. एक तर राजभाषा उर्दू होती, पाचवीपासून वरचे सर्व शिक्षण उर्दूतून होत असे. जे अलिगढला जमले नाही ते निजामाने करून दाखविले. देशी भाषेतून इंजिनिअरिंग व मेडिकलचे शिक्षणसुद्धा देणारे, एम.एस्सी. पर्यंत सर्व विज्ञान शिकवणारे उस्मानिया हे एकमेव विद्यापीठ होते. संपूर्ण कायदा उर्दूत होता. हायकोर्ट उर्दूतून चाले. हा नुसता भाषेचा प्रश्न नव्हता, तर सुट्टी शुक्रवारी असे. अजूर, दय, बहमन हे इराणी महिने चालत. सुट्ट्या मुस्लिम संस्कृतीप्रमाणे असत. मुस्लिम विद्यार्थ्यांना सरकारी शाळेत धर्मशिक्षण मिळण्याची सोय होती. एक अनधिकृत धोरण असे की शिक्षणाचे प्रमाण कधी १० टक्क्यांच्या वर वाढता उपयोगी नाही. ह्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांत मुस्लिम विद्यार्थ्यांचे प्रमाण प्रचंड असले पाहिजे. निरुपद्रवी नोकऱ्यांत २५ टक्के हिंदू आणि ७५ टक्के मुसलमान असे प्रमाण असावे. महत्त्वाच्या सर्व नोकऱ्या - ह्यात पोलिस, लष्कर, प्रशासन असा भाग येई. ह्या क्षेत्रात मुसलमानांचे प्रमाण शेकडा ९५ पर्यंत टिकवून धरले जाई.

 असे सर्व जीवनच मुस्लिम वर्चस्वाखाली असे. सगळ्या जीवनाला इस्लामी रूप

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१४०