पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/137

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गोडवे जरूर गावेत; पण सतत पराभव होत असतानासुद्धा आपले अस्तित्व टिकवून धरणारे जे चिवट निजाम, त्यांचेही कौतुक करायला विसरू नये. एका बलवंताच्या समोर आपला पराभव होतो म्हणून दुसऱ्या बलवंताच्या आश्रयाने टिकून राहण्याची ह्या राजवटीची क्षमता खूप मोठी होती. कधी मराठ्यांशी तह करून, कधी फ्रेंचांशी, तर कधी इंग्रजांशी तह करून हे घराणे आपले अस्तित्व टिकवीत आले. कुणाच्या तरी आश्रयानेच आपण जिवंत राहतो, हे जाणण्याइतका मनाचा तोल ह्या राजवटीजवळ नेहमीच होता. हा तोल संपला आणि हे राज्य निष्कारण हटवादाच्या आहारी जाऊन शेवटच्या निझामाने गमावले. मुत्सद्देगिरीत मुस्लिम राजे आणि मुस्लिम राजकारण नेहमीच हिंदूंच्यापेक्षा सरस असते असा एक समज आहे. जरी हा समज खरा गृहीत धरला तरी मीर उस्मान अलीखान हे ह्या समजाला अपवाद म्हटले पाहिजेत.

 जुने हैदराबाद संस्थान आणि मीर उस्मान- अलीखाननी सज्ज केलेले नवे हैदराबाद संस्थान ह्यात अंतर होते. हैदराबाद संस्थानात नेहमीच मुस्लिम समाजाचा वरचष्मा असे. दीर्घकाळापर्यंत कोणत्या ना कोणत्या तरी मुस्लिम राजवटीखालीच हा प्रदेश राहात आला. संस्थानाची लोकसंख्या पंच्याऐंशी टक्क्याहून अधिक हिंदू होती. उरलेली पंधरा टक्के लोकसंख्या सगळीच मुसलमान नव्हती; पण लोकसंख्येत दहा अकरा टक्के मुसलमान होते. आपल्याशी एकनिष्ठ असणाऱ्या हिंदू जहागीरदारांना आणि बुद्धिमान हिंदू पुरुषांना हाताशी धरून पण मुस्लिम वर्चस्व कायम ठेवून कारभार चालवायचा ही ह्या भागात जुनी परंपरा होती. प्रथम बहामनी घराण्याने, नंतर अहमदनगरच्या निजामशाहीने, विजापूरच्या आदिलशाहीने आणि गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीने ही पद्धत अबाधित चालविलेली होती. हैदराबादच्या निझामानेसुद्धा महबूब अलीच्या अंतापर्यंत हीच प्रथा चालविली. ह्या प्रथेत मुस्लिम राजवटीचे नुकसान काहीच नव्हते. राज्याला बळकटी, इस्लामचा वरचढपणा आणि हिंदूंचे बिनशर्त सहकार्य ह्यांचा समन्वय हा नेहमी सोयीचाच राहिला. इतका तोल जर शेवटच्या निझामाला शिल्लक राहिला असता तर भारतीय राष्ट्राचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले असते. शेवटचा निझाम अतिरेकी होता हाच दैवयोग एकूण चांगला होता असा निर्णय देणे भाग आहे.

 हा शेवटचा निझाम मीर उस्मान अलीखान बहादूर याचा जन्म इ.सं. १८८६ साली झाला आणि वयाच्या पंचविसाव्या वर्षी ह्याला गादी प्राप्त झाली. उस्मान

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जनः/१३९