पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/136

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मोजता मोजता असे लक्षात आले की, परळीकरांनी नाव घेऊन ज्यांचा उल्लेख केलेला आहे त्यांच्यातील सुमारे पंचवीस माणसे माझ्या चांगल्याच ओळखीची आहेत. म्हणून ह्या कथांमध्ये भाषाशैली वगळता काल्पनिक असे काही नाही. पण मला मात्र ज्या चौकटीत ह्या कथा घडल्या त्या चौकटीचा अतिशय थोडक्यात का होईना पण परिचय करून देणे भाग आहे. भारतीय राष्ट्राची प्रादेशिक अखंडताच हैदराबाद आंदोलनाच्या यशाविना शक्य नव्हती, हेही आता आवर्जून सांगावे लागते हीच दुःखाची बाब आहे. पण मराठवाड्याच्या बिनशर्त सहभागाविना संयुक्त महाराष्ट्रच निर्माण होणे अशक्य होते ह्याचीही विस्मृती झालेल्या काळात त्याहूनही अधिक जुन्या गोष्टीचे स्मरण राहिले नाही तर आश्चर्य कशाचे मानावयाचे?

 हैदराबाद संस्थान हे एक लोकविलक्षण प्रकरण होते. एका बाजूला जुना मुंबई प्रांत, एका बाजूला जुना मद्रास, उत्तरेला जुना मध्यप्रदेश असे हे भारताच्या ऐन पोटात असलेले देशी संस्थानांतील सर्वांत मोठे संस्थान होते. सुमारे ८२ हजार चौरस मैलांचा ह्या संस्थानाचा क्षेत्रविस्तार होता. एक कोटी साठ लक्षांच्यावर लोकसंख्या होती. सव्वीस कोटीचे ह्या संस्थानाचे उत्पन्न होते. मोठ्या आत्मीयतेने संस्थानिक म्हणून ज्यांचे महाराष्ट्रात उल्लेख होतात त्यापैकी बहुतेक संस्थानिक हैदराबाद येथील सध्या जहागीरदारांपेक्षा लहान होते. हे संस्थान सोळा जिल्ह्यांत विभागले होते. स्थूलमानाने त्यातील आठ जिल्हे तेलगू भाषिक, पाच जिल्हे मराठी भाषिक, (ह्यांनाच 'मराठवाडा' म्हणतात) आणि तीन जिल्हे कानडी भाषिक होते. भारतावर होऊन गेलेल्या मोगली राजवटीचा हा ऐन नाभिस्थानी शिल्लक असलेला अत्यंत घातुक आणि बलवान असा अवशेष होता.

 मोगल साम्राज्याच्या उतरत्या काळात चिन कुलीनखान म्हणजेच निजामउलमुल्क, आसफजहा पहिला हा दक्षिणेचा सुभेदार म्हणून आला आणि मोगल राजवटीच्या ऱ्हासाचा फायदा घेऊन इ.स. १७२४ पर्यंत त्याने आपल्या सुभेदारीला स्वतंत्र राज्याचे स्वरूप आणले. स्थूलमानाने हे निजाम घराणे सगळे दोनशे चोवीस वर्षे टिकले. हैदराबाद स्वातंत्र्य आंदोलनाच्यावेळी मीर उस्मानअली खानबहाद्दूर हे हैदराबादचे अधिपती होते. ते स्वतःला 'निजामे साबे' म्हणजे सहावे निजाम म्हणत. इतिहासात हा गादीवर आलेला सातवा माणूस; पण त्यांतला एक मोजायचा नाही अशी प्रथा आहे. वारंवार हे आसफजाही राज्य मराठ्यांच्याकडून पराभूत झाले. मराठ्यांच्या शौर्याचे

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१३८