पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/135

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






१3.
'हैदराबाद मुक्तिसंग्रामातील काही कथा'
या पुस्तकाची प्रस्तावना

 आमचे तरुण मित्र अशोक परळीकर ह्यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामातील काही कथा परिश्रमपूर्वक गोळा करून त्यांचा एक संग्रह सिद्ध केला आहे. हैदराबादचा मुक्तिसंग्राम भारतीय सैन्याच्या पोलिस अॅक्शनसह १७ सप्टें. १९४८ ला संपतो. आता ह्या घटनेला सुमारे २७ वर्षे उलटून गेलेली आहेत. ज्या आठवणी ताज्या होत्या त्या पुष्कळशा आता काळाच्या ओघात झावळ झावळ झालेल्या आहेत. इतक्या वर्षानंतर ह्या सर्व हकिकती परिश्रमपूर्वक गोळा करायच्या असे जरी म्हटले आणि कितीही काळजी घेतली तरी तपशिलाच्या किरकोळ चुका राहण्याचा संभव असतो. खरे म्हणजे हा रोमहर्षक इतिहास त्याचकाळी समग्रपणे लिहिला जाणे आवश्यक होते. हैदराबादचा मुक्तिसंग्राम हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक उज्ज्वल आणि लोकविलक्षण असे पर्व होते. ह्या आंदोलनाचा समग्र इतिहास अजून कुणी लिहिलेला नाही. कै. स्वामी रामानंदतीर्थ स्मारक योजनेत असा बृहद् इतिहास लिहिला जाणार आहे. ते कार्य पूर्णतेला कधी जाईल हे सांगता येत नाही. एक तर मराठवाड्यात लेखकांची उणीव, दुसरे म्हणजे ह्या आंदोलनातील काही घटनांचा उच्चार करणे कायदेशीररीत्या अडचणीचे म्हणून दीर्घकाळ मौन पाळणे सर्वांनाच भाग होते.

 एक उदाहरण घेऊन हा मुद्दा थोडा स्पष्ट केला पाहिजे. त्याशिवाय त्याचे मर्म पटणे कठीणच आहे. ह्या संग्रहात उमरी बँकेच्या लुटीचे प्रकरण आहे. ह्या प्रकरणात

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१३६