पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/131

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भारत व हैदराबाद यांच्यात कायमचे संबंध निर्माण करणाऱ्या करारात रस होता. जैसे थे करार याच्या वाटाघाटी चालू असतानाच अनधिकृतरीत्या कायमच्या संबंधाबाबतसुद्धा अलियावर जंग यांनी वाटाघाटी केलेल्या होत्या. या वाटाघाटींना पुढच्या काळात एका नव्या कराराचे स्वरूप आले. जेव्हा प्रत्यक्ष करार अधिकृतरीत्या चर्चेसाठी आला तेव्हा अलियावर जंग हैदराबादच्या राजकारणातून निर्वासित झाले होते. पण अधिकृत करार कुणाच्याही काळात आलेला असो त्या करारामागे डोके अलियावर जंगचे होते.

 हैदराबाद कधी स्वतंत्र राष्ट्र होईल यावर नबाब अलियावर जंग यांचा विश्वास नव्हता. स्वतंत्र राष्ट्र होण्याची कल्पना अव्यवहार्य आणि मूर्खपणाची आहे, सबब ती सोडून द्यावी असे त्यांचे मत होते. स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र हा मूर्खपणा सोडून दिल्यास भारतात विलीन होण्यास आपण हैदराबादला जास्तीत जास्त सवलती मिळवून देऊ. यातच निजामाचे व हैदराबादच्या मुसलमानांचे कल्याण आहे असे त्यांचे म्हणणे आहे. या त्यांच्या भूमिकेमुळेच उस्मानिया विद्यापीठात त्यांना जोड्यांनी मारण्यात आले. सर्व पदांचा राजीनामा त्यांनी दिला. तो स्वीकारण्यात आला. अपमानित होऊन त्यांना राजकीय अज्ञातवासात जावे लागले. कारण अलियावर जंग स्वतंत्र राष्ट्राची कल्पना मानण्यास तयार नव्हते. पण अलियावर जंगांची जी योजना होती ती भारतीय लोकशाहीस किती घातक ठरली असती याचाही एकदा विचार केला पाहिजे. नोव्हेंबर ४७ अखेर जैसे थे करार झाला. केवळ बोलण्यात असलेली अलियावर जंग योजना क्रमाने साकार करण्याचे उद्योग फेब्रुवारी ४८ पासून सुरू झाले. मे १९४८ ला या योजनेला माऊंट बॅटनच्या आग्रहाखातर पटेल आणि नेहरू यांनी मान्यता दिली. जूनच्या मध्यावर ही योजना अधिकृतरीत्या निजामाने फेटाळली. हे सर्व भारतीय लोकशाहीचे सुदैव म्हटले पाहिजे. कासीम रझवीचा आक्रस्ताळेपणा परवडला पण सुस्वभावी आणि शांत असलेल्यास अलियावर जंग यांची योजना नको असे म्हणण्याची पाळी यावी, अशी ती योजना आहे.

 स्थूल मानाने अलियावर जंग यांच्या योजनेचे स्वरूप असे आहे - हैदराबादने भारतात सामील व्हावे. भारताचे सार्वभौमत्व व अधिसत्ता मान्य करावी. या मोबदल्यात भारत सरकारने हैदराबाद संस्थान व निजामाचे राजघराणे टिकवून ठेवण्याची जबाबदारी घ्यावी. म्हणजे निजामाचे राजघराणे टिकले. राजा टिकला. हैदराबाद संस्थान शिल्लक असल्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र हे प्रांत अस्तित्वात येणे संपले. भारताची भाषावर राज्यरचनाच संपली. या योजनेचे दुसरे कलम असे की, हैदराबादला

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१३२